साबणाच्या पाण्यामुळे फेसाळतेय पवना; नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:18 IST2024-12-19T15:17:20+5:302024-12-19T15:18:05+5:30

‘डिटर्जंट आणि साबणाच्या पाण्यामुळे नदी फेसाळत आहे, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Soapy water causes foaming in Pavana; Samples of polluted water in the river sent for testing | साबणाच्या पाण्यामुळे फेसाळतेय पवना; नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले

साबणाच्या पाण्यामुळे फेसाळतेय पवना; नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले

पिंपरी : पवना नदी तीरावर चिंचवड येथे महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव सुरू आहे. तर दुसरीकडे पवना नदी फेसाळली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने दखल घेतली आहे. दूषित पाण्याचे नमुने घेतले असून तपासणीसाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ‘डिटर्जंट आणि साबणाच्या पाण्यामुळे नदी फेसाळत आहे, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

किवळे ते दापोडी दरम्यान पवना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. मंगळवारी दुपारी पवना नदी फेसाळली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत सकाळीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या पथकाने चिंचवड, थेरगाव, रावेत, वाल्हेकरवाडी परिसराची पाहणी केली.

प्रदूषण होण्याचे ठोस उत्तर सापडेना ?

वर्षभरात पवना नदी अनेकदा दूषित पाण्याने फेसाळली. पर्यावरणवादी संस्थांनी आवाज उठवला. त्यानंतर रावेत ते चिंचवड परिसरातील लॉन्ड्री व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतरही नदीचे पाणी फेसाळत आहे. नदीचे प्रदूषण नक्की कशाने होत आहे, याचे ठोस उत्तर प्रदूषण नियंत्रण मंडळाला सापडलेले नाही. त्यांनी केवळ प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

असा आहे अधिकाऱ्यांचा कयास

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नदी फेसाळण्याचे कारण हे डिटर्जंट किंवा साबणाचे पाणी असल्याचे नमूद केले आहे. बंधाऱ्यामध्ये जोपर्यंत पाणी साचून असते तोपर्यंत फेस निर्माण होत नाही. मात्र, धरणातून पाणी सोडल्यानंतर पाणी वाहू लागते. बंधाऱ्यावरून उंचावरून पाणी पडल्यानंतर त्याचा फेस होतो, आजवरच्या तपासलेल्या पाण्यात साबणाचे अंश आढळले आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

पीएमआरडीए, एमआयडीसींना सूचना

प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, ग्रामपंचायतींना गावं, उपनगरांमध्ये तयार होणारे मैला सांडपाणी प्रक्रिया न करता सोडू नये, अशा सूचना केलेल्या आहेत. रावेत, किवळेमध्ये प्रक्रिया न केलेले पाणी थेट नदीत सोडले जात असल्याने प्रदूषणात भर पडत आहे, असा अंदाज व्यक्त केला आहे.

 दुर्गंधीतही वाढ

थेरगाव बंधारा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून आहे. नदीत पाणी सोडल्यानंतर फेस आणि दुर्गंधी येते. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात नागरिकांना त्रास होतो.

पवना नदी प्रदूषणाबाबत तक्रारी आल्यानंतर तातडीने आमचे पथक घटनास्थळी जाते, पाहणी करते. आज सकाळीही पथक चिंचवडला गेले होते. तेथे पाण्याचे नमुने घेतले. दोन ते तीन दिवसांत अहवाल येईल. फेस कशामुळे आला, याचे कारण समजेल. मात्र, आजवरच्या नमुन्यांच्या तपासणीत असा निष्कर्ष आहे की, पाण्यात डिटर्जंट, साबणाचे प्रमाण अधिक असल्याने फेस होत असावा. नदी प्रदूषणाबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आम्ही संबंधित प्रशासनास केलेल्या आहेत. - मंचक जाधव, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Web Title: Soapy water causes foaming in Pavana; Samples of polluted water in the river sent for testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.