धक्का लागला, सहा अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खून; भोसरीतील धक्कादायक घटना
By नारायण बडगुजर | Updated: July 21, 2024 18:33 IST2024-07-21T18:33:13+5:302024-07-21T18:33:52+5:30
अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत असताना तरुणाला धक्का लागला होता

धक्का लागला, सहा अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खून; भोसरीतील धक्कादायक घटना
पिंपरी : धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्याचा राग आल्याने अल्पवयीन सहा मुलांनी तरुणाचा खून केला. तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्याला गंभीर जखमी केले. यात तरुणाचा मृत्यू झाला. भोसरी येथील शांतीनगर येथे शनिवारी (दि. २०) रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
किरण बाळू लेंढघर (२८, रा. शांतीनगर, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्षल बाळू लेंढघर (३२, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. २१) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बीएनएस कलम १०३ (१), १८९ (२) (४), १९१ (२), १९१ (३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हे त्यांच्या घराजवळ असताना त्यांचा एका अल्पवयीन मुलाला धक्का लागला. दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन मुलाने किरण यांच्याशी वाद घातला. त्यांची बाचाबाची झाली. त्या रागातून अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून किरण यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. किरण रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.