RTE Admissions: आरटीईची वेबसाईट ठप्प...! पालकांनो चिंता करू नका; मुदतवाढ मिळाली
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: April 19, 2023 13:19 IST2023-04-19T13:19:28+5:302023-04-19T13:19:40+5:30
आरटीईची वेबसाइट स्लो असल्याने शहरात तीन हजार मुलांची निवड झालेली असतानाही फक्त तीस जणांनीच प्रवेश घेतला

RTE Admissions: आरटीईची वेबसाईट ठप्प...! पालकांनो चिंता करू नका; मुदतवाढ मिळाली
पिंपरी : शिक्षणाचा अधिकार (आरटीई) वेबसाईट ही स्लो चालत असल्यामुळे पालकांना पुढील प्रक्रिया पार पाडता आली नाही. त्यामुळे शासनाने प्रवेशासाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांची चिंता मिटली आहे.
आरटीई अंतर्गत बालकांना शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळतो. सध्या याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, पालकांना एसएमएस येत नसून, आरटीईची वेबसाइट स्लो आहे. त्यामुळे शहरात तीन हजार मुलांची निवड झालेली असतानाही फक्त तीस जणांनीच प्रवेश घेतला आहे.
यंदाच्या वर्षी आरटीईसाठी १७२ शाळांनी नोंदणी केली असून ३२२५ जागांवर मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. शहरातून जवळपास ११ हजार पालकांनी आपल्या मुलांसाठी अर्ज सादर केला आहे. त्यापैकी ३ हजार २२५ मुलांची निवड झाली असून, फक्त तीस जणांनीच आपला प्रवेश निश्चित केला आहे. सध्यस्थितीत आरटीई २५ टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्यामुळे पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत पालकांनी संभ्रम बाळगू नये. ज्या बालकांची निवड सोडत (लॉटरी) द्वारे झाली आहे, अशा बालकांना शाळा प्रवेशासाठी पुरेसा कालवधी देण्यात येत असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या पत्रात नमूद केले आहे.
कधीपर्यंत मुदतवाढ तेच नाही नमुद...
निवड झालेल्या यादीमध्ये नाव असलेल्या बालकांच्या कागदपत्रांची तपासणी पडताळणी समितीकडे करण्याची मुदत २५ एप्रिलपर्यंत आहे. यास आता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुदत कधी पर्यंत वाढविली हे पत्रात नमूद केले नाही.