अचानक थांबलेल्या बसला रिक्षाची धकड; रिक्षाचालकाचा मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 18:34 IST2021-03-08T18:33:23+5:302021-03-08T18:34:02+5:30
बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

अचानक थांबलेल्या बसला रिक्षाची धकड; रिक्षाचालकाचा मृत्यू, एक जखमी
पिंपरी : अचानक थांबलेल्या बसला पाठीमागून रिक्षा धडकली. यात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला तसेच एक जखमी झाला. चिखली येथे स्पाईन रस्त्यावर कृष्णानगर चाैकाजवळ १ मार्च २०२१ रोजी हा अपघात झाला.
नितीन भागवत थोरात (वय २८), असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तसेच सुहास आगतराव गायकवाड (वय ३१), असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी प्रकाश शांताराम परब यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ७) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक नितीन थोरात हा त्याचा मित्र सुहास गायकवाड हे दोघे रिक्षातून जलशुद्धीकरण केंद्र, म्हेत्रेवस्ती येथून कृष्णानगर चाैकाकडे स्पाईन रोडने जात होते. त्यावेळी कृष्णानगर चाैकाजवळ रिक्षाच्या पुढे जाणारी बस अचानक थांबल्याने रिक्षा बसच्या पाठीमागील भागास धडकली. यात गंभीर जखमी झाल्याने रिक्षाचालक थोरात या चा मृत्यू झाला. रिक्षात पाठीमागे बसलेला सुहास गायकवाड हा देखील या अपघातात जखमी झाला. तसेच रिक्षाचेही नुकसान झाले.