पुणेकरांनी वर्षभरात रिचवली १३ कोटी ८८ लाख लिटर दारू; देशी, विदेशी मद्यासोबतच बीअरला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 13:21 IST2024-04-19T13:19:40+5:302024-04-19T13:21:11+5:30
स्वस्त मिळते म्हणून देशी दारू घेणाऱ्या तळीरामांची संख्या मोठी असून विदेशी मद्य आणि बीअर घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसतीये

पुणेकरांनी वर्षभरात रिचवली १३ कोटी ८८ लाख लिटर दारू; देशी, विदेशी मद्यासोबतच बीअरला पसंती
पिंपरी : उन्हाचा तडाखा वाढला असून, शौकिनांकडून थंडगार बीअरला पसंती दिली जात आहे. देशी आणि विदेशी मद्याचीही झिंग चढत आहे. पुणे जिल्ह्यातील शौकिनांनी एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षभरात १३ कोटी ८८ लाख ३७ हजार ३२१ लिटर दारू रिचवली आहे.
बीअरचा गारवा हवाहवासा...
स्वस्त मिळते म्हणून देशी दारू घेणाऱ्या तळीरामांची संख्या मोठी आहे. विदेशी मद्य आणि बीअर घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या कडक उन्हाळा असून, देशी व विदेशी मद्यांच्या तुलनेत थंडगार बीअरची विक्री जास्त होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मागील वर्षात बीअरची विक्री ९.२ टक्क्यांनी वाढली. देशी ७.४ टक्के, तर विदेशी मद्य ९.८ टक्के जास्त विकले गेले.
मे महिन्यात सर्वाधिक विक्री
उन्हाळ्यात बीअरला जास्त मागणी असते. गेल्यावर्षीही पारा चाळिशी पार गेला होता. त्यामुळे मे २०२३ मध्ये बीअरची सर्वाधिक ६२ लाख ९ हजार २२४ लिटर विक्री झाली. गेल्यावर्षी मार्चमध्ये ५३ लाख ५७ हजार १२३ लिटर बीअर विक्री झाली होती. मात्र, यंदा सूर्य तापल्याने मार्चमध्ये शौकिनांनी ५४ लाख ६७ हजार ४५७ लिटर बीअर रिचवली.
नववर्ष स्वागतासाठी ‘विदेशी’च
नववर्ष स्वागतासाठी शौकिनांकडून मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते. यात विदेशी मद्याला सर्वाधिक पसंती असते. डिसेंबर २०२२ मध्ये ४१ लाख ९५ हजार ४७३ लिटर विदेशी मद्य, तर डिसेंबर २०२३ मध्ये ४६ लाख १४ हजार ३५६ लिटर मद्य विक्री झाली. २०२२च्या तुलनेत १० टक्के जास्त अर्थात चार लाख ८८ हजार ८३ लिटर जास्त विदेशी मद्याची विक्री झाली.
‘वाईन’कडे फिरवली पाठ
उच्चभ्रू शौकिनांकडून वाईनला पसंती दिली जाते. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाईनच्या विक्रीत १.४ टक्के घट झाली. गेल्यावर्षी २१ लाख ४९ हजार २१८ हजार लिटर, तर यंदा २१ लाख १९ हजार ९४४ लिटर वाईनची विक्री झाली.
आर्थिक वर्षनिहाय (एप्रिल ते मार्च) मद्यविक्री
१) देशी दारू
वर्ष - विक्री (कोटी लिटरमध्ये)
२०१८-१९ : २,८३,८१,४२९
२०१९-२० : २,८८,६७,८५१
२०२०-२१ : २,५६,७७,३५५
२०२१-२२ : २,७०,७०,४१२
२०२२-२३ : ३,१०,२६,२८३
२०२३-२४ : ३,३३,२२,९०१
२) विदेशी दारू
वर्ष - विक्री (कोटी लिटरमध्ये)
२०१८-१९ : ३,३५,२५,०७७
२०१९-२० : ३,४७,८०,१७०
२०२०-२१ : ३,१७,१५,५२६
२०२१-२२ : ३,४८,७४,५८८
२०२२-२३ : ४,३०,१७,७०२
२०२३-२४ : ४,७२,५०,०६२
३) बीअर
वर्ष - विक्री (कोटी लिटरमध्ये)
२०१८-१९ : ४,९८,९९,६२६
२०१९-२० : ५,००,५२,५२१
२०२०-२१ : ३,२२,६८,४६९
२०२१ -२२ : ३,५१,७०,३९२
२०२२-२३ : ५,८२,६४,३५८
२०२३-२४ : ५,३१,१०,१३६