वाकडचा ‘एक्यूआय’ तीनशेपार; हवेची गुणवत्ता अतिखराब पातळीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:59 IST2025-12-30T14:59:31+5:302025-12-30T14:59:57+5:30
बांधकामांच्या धुळीमुळे नागरिकांचा श्वास गुदमरला; तातडीने उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी

वाकडचा ‘एक्यूआय’ तीनशेपार; हवेची गुणवत्ता अतिखराब पातळीवर
पिंपरी : आयटी हब असलेल्या वाकड आणि हिंजवडी परिसरातील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांत अतिखराब पातळीवर पोहोचली आहे. परिसरात कार्यरत आरएमसी प्रकल्पामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यात रविवारी बाहेर पडलेल्या प्रवाशांच्या वाहनांनी भर घातली होती. यामुळे एक्यूआयने धोकादायक ३०० ची पातळी ओलांडली.
डिसेंबरच्या पहिल्याच पंधरवड्यात शहराच्या एक्यूआयने १४ दिवसांपैकी सात दिवस २०० अंकांची मर्यादा ओलांडली होती. यामुळे डिसेंबर महिना सुरू झाल्यापासूनच हवेची पातळी खालावत आहे.
भूमकरनगर प्रदूषणाचा ‘हॉटस्पॉट’
वाकडमधील भूमकरनगर परिसरात प्रदूषणाची तीव्रता सर्वाधिक नोंदवण्यात आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला निर्देशांक २४२ ते २८७ च्या दरम्यान होता. मात्र, शुक्रवारपासून यात मोठी वाढ झाली. शुक्रवारी ३२४, शनिवारी ३०० तर रविवारी ३१४ नोंदवला गेला. एकाच महिन्यात पाच वेळा या परिसरातील हवा ‘अतिखराब’ नोंदवली गेली असून, त्यातील तीन दिवस याच आठवड्यातील आहेत. इथल्या हवेत पीएम २.५ सूक्ष्म धूलिकणांचे सरासरी प्रमाण ३०७, पीएम १० चे सरासरी प्रमाण २५१ इतके नोंदवले गेले. हवेची अतिखराब पातळी आहे. यात श्वास घेणे धोकादायक मानले जाते.
प्रदूषणाचे मुख्य कारण
वाकड आणि हिंजवडी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमधून उडणारी धूळ रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. परिसरात मोठ्या संख्येने कार्यरत असलेले आरएमसी प्रकल्प प्रदूषणात भर घालत आहेत. या प्रकल्पांमधून निघणारी सिमेंटची धूळ आणि प्रकल्पातील वाहनांमुळे हवेची पातळी खालावली आहे.
आरोग्याला गंभीर धोका
हवेची पातळी अतिखराब श्रेणीत असल्याने, निरोगी व्यक्तींनाही दीर्घकाळ या वातावरणात राहिल्यास श्वसनाचा त्रास होऊ शकतो. आधीच श्वसनविकार किंवा दमा असलेल्या रुग्णांसाठी ही हवा विषारी ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे फुफ्फुसांचे विकार, घशात खवखव आणि डोळ्यांची जळजळ अशा समस्या वाढू शकतात.
मॉर्निंग वॉकला गेल्यावर किंवा खिडकी उघडल्यावर हवेत धूळ स्पष्टपणे जाणवते. बांधकामांच्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. प्रशासनाने यावर तातडीने कडक निर्बंध लादणे गरजेचे आहे. - अजित साळुंखे, स्थानिक नागरिक