मावळात ‘सैराट’..! नातेवाईक तरुणीच्या प्रेमसंबंधाचा रागातून दिली खुनाची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:56 IST2025-11-13T17:55:26+5:302025-11-13T17:56:04+5:30
गुंडाविरोधी पथकाने तिघांना केले जेरबंद; रायगड व साताऱ्यातून संशयित ताब्यात

मावळात ‘सैराट’..! नातेवाईक तरुणीच्या प्रेमसंबंधाचा रागातून दिली खुनाची सुपारी
पिंपरी : नातेवाईक तरुणीच्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून तिच्या प्रियकराचा खून करण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘सैराट’ चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे घडलेल्या या घटनेने मावळ तालुक्यात खळबळ उडाली. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने तिघांना ताब्यात घेत कारवाई केली आहे.
अभिजीत संतोष केदारी (वय २६), नितीन ज्ञानदेव केदारी (४२, दोघेही रा. ताजे, ता. मावळ) आणि आकाश अण्णा भोकसे (२६, रा. कुरकुंडी, ता. खेड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी किरण बाळासाहेब केदारी (वय ३३, रा. ताजे, मळवली, ता. मावळ) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मावळ तालुक्यातील ओझर्डे गावाच्या हद्दीत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत ओझर्डे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी (दि. ११ नोव्हेंबर) रात्री साडदेहाच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादीचा भाऊ विकास बाळासाहेब केदारी (३१, रा. ताजे) याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मानेवर पिस्तूलसारख्या हत्याराने गोळी मारून गंभीर जखमी केले. फिर्यादीला संशय आहे की, विकास याचे संशयित अभिजित याच्या नातेवाईक तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांच्या कारणामुळे संशयितांनी हा हल्ला केला.
दरम्यान, घटनेनंतर संशयित पसार झाले. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुंडा विरोधी पथक करत होते. पथकाने संशयितांचा माग काढला. गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने आणि उपनिरीक्षक समीर लोंढे यांना संशयितांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार तिघांना ताब्यात घेतले. यात संशयित अभिजित केदारी याला रायगड जिल्ह्यातील माथेरान येथून तर नितीन केदारी याला सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील मांढरदेवी येथून ताब्यात घेतले. तिघा संशयितांपैकी नितीन केदारी आणि आकाश भोकसे यांच्यावर पूर्वीपासून खून आणि शस्त्रप्रकरणी गंभीर गुन्हे नोंद आहेत. नितीन केदारीवर कामशेत पोलिस ठाण्यात भादंवी कलम ३०२ अंतर्गत तर आकाश भोकसेवर चाकण (ट्रिपल मर्डर प्रकरण) आणि ओशिवारा पोलिस ठाण्यातील शस्त्रप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.