म्हाडातर्फे पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये साडेचार हजार घरांची सोडत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:52 IST2025-09-03T17:51:25+5:302025-09-03T17:52:17+5:30
- नियमांचे उल्लंघन केल्यास म्हाडा गुन्हे दाखल करणार : शिवाजीराव आढळराव पाटील

म्हाडातर्फे पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये साडेचार हजार घरांची सोडत
पिंपरी : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण पुणे (म्हाडा) वतीने येत्या पंधरा दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये साडेचार हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर चाकण आणि नेरे परिसरामध्ये नवीन प्रकल्प उभारण्याची उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहिती म्हाडाचे पुणे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी पिंपरी- चिंचवड आढळराव पाटील आले असताना पत्रकारांशी संवाद साधला. आढळराव पाटील म्हणाले, म्हाडाच्या पुणे महामंडळाअंतर्गत पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. महामंडळाच्या माध्यमातून विविध भागांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये आत्तापर्यंत घरकुलांसाठी तीन सोडती काढल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांमध्ये सुमारे साडेचार हजार घरांची सोडत निघणार आहे.'
संत तुकारामनगर येथील जुन्या गाळ्यांचे पुनर्विकास प्रक्रिया सुरू
आढळराव पाटील म्हणाले, म्हाडाच्या वतीने स्वतंत्र प्रकल्प उभारण्याबरोबरच खाजगी विकसकांच्या माध्यमातूनही प्रकल्प उभारले जात आहेत. त्यात म्हाडाची भूमिका महत्त्वाची आहे. संत तुकारामनगर येथील सुमारे एक हजार गाळ्यांचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया तेथील गाळेधारक एकत्र येऊन खाजगी विकासाच्या माध्यमातून प्रकल्प राबवू शकतात. त्या प्रकल्पाला ना हरकत देण्याचे काम म्हाडा करीत आहे.'
चाकण आणि नेरे येथे नव्याने प्रकल्पांचे नियोजन
शहराचा विकास वेगाने होत आहे. त्यामुळे त्या- त्या भागांमध्ये प्रकल्प उभारण्याकडे प्राधान्य दिले जात आहे. म्हाडाच्या वतीने चाकण आणि पिंपरी- चिंचवड शहरालगतच्या भागांमध्ये असणाऱ्या चाकण आणि नेरे परिसरामध्ये असणाऱ्या म्हाडाच्या नवीन प्रकल्प राबविण्याचे नियोजन सुरू आहे, असेही आढळराव पाटील यांनी सांगितले.
विकासाकांवर गुन्हे दाखल
''खाजगी विकासाच्या माध्यमातून प्रकल्प उभारून त्यामध्ये म्हाडाच्या लॉटरीतील लाभार्थ्यांना घरे दिली जातात. याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर आम्ही तातडीने त्या ठिकाणी पाहणी करतो. म्हाडासाठी घरे देताना जे निकष आहेत, त्या निकषांचे पालन करणे गरजेचे आहे. या संदर्भातील तक्रारी मंडळाकडे आल्यानंतर त्यावर तातडीने कारवाई केली जाते. नियमांचे उल्लंघन केले असल्यास गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील काही विकासकांवर गुन्हे दाखल केले आहेत, असेही आढळराव पाटील यांनी सांगितले.