सांगवी फाट्याजवळील औंध-रावेत बीआरटी मार्ग ठरतोय ‘डेथ ट्रॅप’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 18:54 IST2026-04-11T18:54:19+5:302026-04-11T18:54:43+5:30
- अजून किती निष्पाप सोहमचा बळी घेतल्यावर महापालिका प्रशासनाला येणार जाग

सांगवी फाट्याजवळील औंध-रावेत बीआरटी मार्ग ठरतोय ‘डेथ ट्रॅप’
- अमृता दातीर-जोशी
सांगवी : स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराचा फटका आता निष्पाप नागरिकांच्या मुळावर उठला असून, सांगवी फाटा परिसर ‘डेथ ट्रॅप’ बनला आहे. औंध-रावेत बीआरटी या वर्दळीच्या मार्गावर रस्ता ओलांडताना सोहम व्यास या २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा अपघाती बळी गेल्याने सांगवी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. डोळ्यांत भविष्याची स्वप्ने घेऊन घराकडे परतणाऱ्या एका विद्यार्थ्याचा प्रशासकीय उदासीनतेमुळे असा दारूण अंत झाल्याने, अजून किती सोहमचा बळी घेतल्यावर महापालिकेला जाग येणार? असा संतप्त सवाल आता या भागातील सामान्य नागरिक विचारत आहेत.
सांगवी फाटा परिसरात रस्ता ओलांडण्यासाठी कोणतीही सुरक्षित सुविधा उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून हा सहापदरी रस्ता बीआरटी मार्ग पार करावा लागतो. रस्त्याच्या मधोमध उभारलेले लोखंडी रेलिंग, बॅरिकेट्समुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. सांगवी फाट्यावरून तसेच जिल्हा रुग्णालयाकडून औंधच्या दिशेने जाण्यासाठी किंवा औंध दिशेहून सांगवीकडे रस्ता ओलांडण्याची कोणतीही सोय येथे नाही. सध्या असलेला भुयारी मार्ग केवळ बीआरटी बसस्थानकापर्यंतच मर्यादित असून, तोदेखील देखभालीअभावी महिलांसाठी असुरक्षित बनला आहे. महापालिका प्रशासनाकडून एकीकडे याच परिसरात सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना, हजारो नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या रोजच्या वापरासाठी आवश्यक असलेला पादचारी पूल किंवा स्कायवॉक बांधण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
या परिस्थितीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत असून, याठिकाणी तातडीने भुयारी मार्ग वाढवण्याची किंवा स्कायवॉक उभारण्याची मागणी जोर धरत आहे. स्कायवॉकमुळे खर्चात बचत होऊन महिलांना सुरक्षितता मिळेल आणि वाहतुकीला अडथळा न होता हे काम लवकर पूर्ण होऊ शकेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
या भागात सब वे आणि बीआरटीसाठीचा भुयारी पादचारी मार्ग आहे. परंतु, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक कामे करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. स्कायवॉक उभारण्याच्या धर्तीवर संबंधित ठिकाणाचे सर्वेक्षण केले जाईल. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार स्कायवॉक उभारण्याची कार्यवाही केली जाईल. त्याबाबतच्या तांत्रिक अभिप्रायासाठी नागरी विकास विभागाशी पत्रव्यवहार केला आहे - संध्या वाघ, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग
‘माझा सोहम तर आता कधीच परत येणार नाही. आज जो प्रसंग आमच्या कुटुंबावर ओढवला आहे, तो उद्या इतर कोणावरही येऊ नये. यातून प्रशासनाने धडा घ्यावा आणि इथे सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सोय करावी. तसेच गुन्हेगाराला कठोरातील कठोर शासन करावे. - दीपक व्यास