मावळ तालुक्यात अजित पवार गटाला खिंडार; प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:46 IST2025-09-16T15:45:31+5:302025-09-16T15:46:47+5:30

- काँग्रेसचे नेते रामदास काकडे यांचाही समावेश

pune news ajit Pawar group faces setback in Maval taluka; key leaders join bjp | मावळ तालुक्यात अजित पवार गटाला खिंडार; प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश  

मावळ तालुक्यात अजित पवार गटाला खिंडार; प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश  

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील काँग्रेसचे नेते तथा तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष रामदास काकडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी कृषी, पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, बाजार समितीचे संचालक सुभाष जाधव, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे आदी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. हे सर्व नेते विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या बापूसाहेब भेगडे यांचे समर्थक आहेत.

सोमवारी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, रवींद्र भेगडे, नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यावेळी चव्हाण म्हणाले की, पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश केोल्या सर्वांना सन्मान देऊ. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये माजी जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, माजी जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे, वडगावचे माजी सदस्य अरुण चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती अतिश परदेशी, बाजार समितीचे सभापती शिवाजी असवले, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, खरेदी-विक्री संघ संचालक बाजीराव वाजे, माजी नगरसेवक अरुण माने, प्रवीण काळोखे, तुषार भेगडे, तनुजा जगनाडे, बॉबी डिका, कैलास खांडभोर यांचा समावेश आहे.

बापूसाहेब भेगडे यांची भूमिका गुलदस्त्यात

मावळ विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केलेल्या बापूसाहेब भेगडे यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु भेगडे प्रवेशाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने मावळ तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Web Title: pune news ajit Pawar group faces setback in Maval taluka; key leaders join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.