आईला उपसरपंचपदाच्या निवडणुकीत का पाडले?’ कामशेतमध्ये हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:39 IST2026-01-09T12:38:22+5:302026-01-09T12:39:19+5:30
राजकीय वादातून हॉटेल व्यावसायिकावर हल्ला; संशयित फरार; पोलिस तपास सुरू

आईला उपसरपंचपदाच्या निवडणुकीत का पाडले?’ कामशेतमध्ये हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
कामशेत : उपसरपंचपदाच्या निवडणुकीतील राजकीय वादातून एका हॉटेल व्यावसायिकावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. ८) पहाटे कामशेत गावठाण परिसरात घडली. ‘माझ्या आईला उपसरपंचपदाच्या निवडणुकीत का पाडले’, असा जाब विचारत आरोपीने थेट डोक्यावर वार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित फरार आहे.
फिर्यादी नीलेश मोहन दाभाडे (४४, रा. कामशेत) हे गुरुवारी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घरासमोर उभे असताना ही घटना घडली. त्याच वेळी संशयित आरोपी ऋषिकेश सुरेश शिंदे (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, कामशेत) हा दुचाकीवरून (क्र. एमएच १४ केझेड २२४७) तेथे आला.
आरोपीच्या हातात लोखंडी, धारदार कोयता होता. ‘तुम्ही माझ्या आईला उपसरपंचपदाच्या निवडणुकीत का पाडले?’ असे म्हणत आरोपीने दाभाडे यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. सहायक पोलिस निरीक्षक सुनील पोवार हे व पोलिस निरीक्षक शंकर पाटील तपास करीत आहेत.