हॅलो इन्स्पेक्टर : तपासाची चक्रे फिरवली...! आधी मारेकऱ्यांना पकडले अन् नंतर मृतदेहाची ओळख पटविली
By नारायण बडगुजर | Updated: April 16, 2026 12:49 IST2026-04-16T12:49:24+5:302026-04-16T12:49:33+5:30
- कोणताही ठोस धागादोरा नसताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करून खुनाच्या गुन्ह्याची केली उकल

हॅलो इन्स्पेक्टर : तपासाची चक्रे फिरवली...! आधी मारेकऱ्यांना पकडले अन् नंतर मृतदेहाची ओळख पटविली
पिंपरी : कोणताही धागादोरा नसताना सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या प्रकरणाची अवघ्या २४ तासांत उकल करत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने तपास केला. सीसीटीव्ही फूटेजची छाननी करीत पोलिसांनी आधी तीन संशयितांना जेरबंद केले आणि त्यानंतर मयताची ओळख पटविण्यात यश मिळवले. खून प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेऊन खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यात आल्याचे हे दुर्मीळ प्रकरण ठरले.
चिखलीमधील पाटीलनगर येथे वन विभागाच्या जागेत २ फेब्रुवारी २०२५ रोजी एक अनोळखी मृतदेह आढळला. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकांनी तपास सुरू केला. ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे तपासताना अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे आणि स्वप्निल महाले यांना एक संशयित रिक्षा दिसून आली. त्यावरून मालकाकडे चौकशी केली. चिखलीतील एका चौकातून तीन जणांना रिक्षात बसविले होते, असे रिक्षामालकाने सांगितले. त्यानुसार २९ वर्षीय, २८ वर्षीय आणि २४ वर्षीय अशा तीन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांनी खुनाची कबुली दिली.
दारू प्यायला पैसे घेण्यासाठी खून
तीन संशयित तरुण एका रिक्षामधून जात होते. त्यावेळी चिखलीतील चौकात मद्यधुंद अवस्थेत ३३ वर्षीय तरुण दिसून आला. दारू पिण्यासाठी पैसे काढून घेण्यासाठी मद्यधुंद तरुणाला तिघांनी रिक्षात टाकून घेतले. त्याच्याकडे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे पाटीलनगर येथे नेऊन त्याला मारहाण केली. त्यानंतर दगडाने चेहरा विद्रूप केला. त्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती.
पोलिसांनी गाठले खान्देश
खुनी, खुनाचे कारण काय? याची उकल झाली. मात्र, खून कोणाचा झाला? याबाबत माहिती मिळत नव्हती. तरुणाच्या हातावर केवळ एका महिलेचे नाव होते. त्यावरून ओळख पटविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा तपासाची चक्रे फिरवली. ज्या चौकात तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. तेथील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात एक महिला त्याला चौकात साेडून गेल्याचे दिसून आले. महिलेचा शोध घेण्यासाठी पथकाने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे जाऊन महिलेकडे चौकशी केली. खून झालेला तरुण माझा पती होता. कामाधंद्यानिमित्त आम्ही पिंपरी-चिंचवड शहरात आलो होतो. मात्र, माझा पती दारूच्या आहारी गेला होता. मद्यधुंद असल्याने त्याला चिखलीतील चौकात सोडून दिले होते, असे तिने सांगितले.
या प्रकरणातील संशयित आणि खून झालेला तरुण हे एकमेकांच्या ओळखीचे नव्हते. मात्र, आमच्या पथकाने २४ तासांत संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर खून झालेल्या तरुणाची ओळख पटविण्यात यश आले. गुन्ह्याची उकल केली होती. - सुहास आव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक