२ कोटींची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित; वरिष्ठांच्या सूचनेकडेही केले होते दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 21:02 IST2025-11-04T21:01:02+5:302025-11-04T21:02:35+5:30
शहाणा असशील तर आरोपी अटक कर, अशी सूचना देऊनही या पोलिसाने वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून लाचेची मागणी केली

२ कोटींची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित; वरिष्ठांच्या सूचनेकडेही केले होते दुर्लक्ष
पिंपरी : फसवणूक प्रकरणात अटक असलेल्या संशयिताला मदत करण्यासाठी दोन कोटींची लाच मागणारा पोलिस उपनिरीक्षक आणि संबंधित विभागाचे पोलिस निरीक्षक यांच्यावर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कठोर कारवाई केली आहे. उपनिरीक्षकाचे निलंबन केले आहे. तर पोलिस निरीक्षकांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चार कोटींच्या फसवणुकीचा एक गुन्हा तपासासाठी आहे. त्या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांनी संशयिताला मदत करण्यासाठी संशयिताच्या वकिलाकडे लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर ‘एसीबी’ने पुणे येथील रास्तापेठ येथे कारवाई करत पोलिस उपनिरीक्षक चिंतामणी याला रंगेहाथ पकडले.
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तांची कारवाई एवढ्यावर थांबलेली नाही. आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप सावंत यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे.
‘शहाणा असशील तर आरोपी अटक कर’
पोलिस उपनिरीक्षक चिंतामणी याने तक्रारदार यांना पोलिस निरीक्षक संदीप सावंत यांच्याकडे घेऊन गेला. त्यावेळी निरीक्षक सावंत यांनी तक्रारदारासमोर उपनिरीक्षक चिंतामणी याच्याशी गुन्ह्याशी संबंधित चर्चा केली. याप्रकरणात कायदेशीर कारवाई कर, असे निरीक्षक सावंत यांनी तक्रारदारासमोर उपनिरीक्षक चिंतामणी याला सांगितले. शहाणा असशील तर आरोपी अटक कर, अशी सूचनाही निरीक्षक सावंत यांनी चिंतामणी याला केली. त्यानंतरही चिंतामणी याने वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून लाचेची मागणी केली.