खाकी वर्दीच 'असुरक्षित'; पिंपरीत वर्षभरामध्ये पोलिसांवरच झाले सर्वाधिक हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 15:33 IST2021-01-18T14:27:59+5:302021-01-18T15:33:10+5:30
कोरोना काळातही घडल्या घटना : वाहतूक नियमनादरम्यान होतात वाद

खाकी वर्दीच 'असुरक्षित'; पिंपरीत वर्षभरामध्ये पोलिसांवरच झाले सर्वाधिक हल्ले
नारायण बडगुजर -
पिंपरी : सरकारी काम अन् सहा महिने थांब, या म्हणीचा प्रत्यय शासकीय कार्यालयांमध्ये येतो. त्यामुळे हेलपाटे मारणारे नागरिक वैतागतात. त्यांचा राग अनावर होतो आणि सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हल्ले केले जातात. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२० या वर्षामध्ये अशा प्रकारचे ५० गुन्हे दाखल आहेत. त्यात पोलिसांवर ४१ हल्ले झाले असून सर्वाधिक वाहतूक पोलिसांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले.
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले. त्यामुळे पोलिसांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. त्यांच्या कामाचे कौतुकही झाले. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी मदतीचेही हात पुढे आले. मात्र त्याचवेळी काही नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करीत पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तर काही नागरिकांनी थेट पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. तसेच इतर सरकारी कर्मचाऱ्यांवरही हल्ले झाले. महावितरण कंपनी, महसूल विभाग यासह विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात आले.
वाहतूक विभाग टार्गेट
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून पुणे-मुंबई महामार्ग, द्रुतगती मार्ग, मुंबई -बेंगळुरू महामार्ग, पुणे - नाशिक महामार्ग, तळेगाव - चाकण - शिक्रापूर राज्यमहामार्ग जातात. या मार्गांसह शहरात ठिकठिकाणी वाहतूक नियमनाची आवश्यकता असते. बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. अशा वेळी वाहनचालक पोलिसांशी हुज्जत घालतात. तसेच त्यांच्या कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना मारहाण करतात. वर्षभरात वाहतूक पोलिसांवर सर्वाधिक हल्ले झाले.
चारचाकीच्या बोनटवर नेले फरफटत
चिंचवड येथील चापेकर चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला चारचाकी वाहनचालकाने त्याच्या वाहनाच्या बोनटवर फरपटत नेले होते. सुदैवाने यातून संबंधित वाहतूक पोलीस बचावला. वाहन थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले
२०१९ (नोव्हेंबरपर्यंत) २०२०
पोलीस ३३ ४१
इतर १६ ९
एकूण ४९ ५०