पिंपरी-चिंचवडमधील डंपर-हायवा, सिमेंट मिक्सर ट्रकच्या बेफाम वेगावर पोलिसांचा अंकुश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:22 IST2025-12-03T20:22:26+5:302025-12-03T20:22:47+5:30
पिंपरी-चिंचवडमधील सुसाट अवजड वाहनांना ‘ब्रेक’; प्रतितास ३० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित

पिंपरी-चिंचवडमधील डंपर-हायवा, सिमेंट मिक्सर ट्रकच्या बेफाम वेगावर पोलिसांचा अंकुश
पिंपरी : डंपर, हायवा, सिमेंट मिक्सर ट्रकसारख्या जड-अवजड वाहनांच्या बेफाम वेगामुळे शहरात सातत्याने भीषण अपघात होत आहेत. याला आळा घालण्यासाठी अवजड वाहनांच्या वेगमर्यादेला लगाम घालण्यात आला आहे. यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील महामार्ग वगळून सेवारस्ते व सर्व अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांसाठी प्रतितास ३० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबत मंगळवारी (दि. २ डिसेंबर) आदेश दिले आहेत. बुधवारपासून (दि. ३ डिसेंबर) हा आदेश लागू करण्यात आला आहे. हिंजवडी आयटी पार्क, एमआयडीसी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अपघातांची संख्या वाढत आहे. यात अनेकांचा मृत्यू होत आहे. गेल्या तीन वर्षांतील अपघातातील मृतांच्या आकडेवारीने चिंता व्यक्त केली जात आहे. वारंवार होणारे अपघात, वाढता जीवितहानीचा धोका आणि त्यातून निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन वाहतूक विभागाकडून वेगमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या हद्दीतील महामार्ग वगळता महामार्गांचे सेवारस्ते आणि शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांवर डंपर, हायवा, सिमेट मिक्सर ट्रक आणि इतर सर्व जड-अवजड वाहनांना फक्त ३० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहतूक करण्याची सक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलिस वाहने आणि इतर अधिकृत अत्यावश्यक सेवा यांना यातून सवलत देण्यात आली आहे.