पिंपरी-चिंचवड आरटीओकडून शासनाच्या तिजोरीत १०९५ कोटी; आतापर्यंतच्या उत्पन्नाचा उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:53 IST2025-01-07T12:52:59+5:302025-01-07T12:53:53+5:30
उपनगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही

पिंपरी-चिंचवड आरटीओकडून शासनाच्या तिजोरीत १०९५ कोटी; आतापर्यंतच्या उत्पन्नाचा उच्चांक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) २०२४ मध्ये १ लाख ९१ हजार ९८३ विविध वाहनांची नोंदणी झाली आहे. तसेच २०२४ मध्ये पिंपरी-चिंचवड आरटीओने उत्पन्नाचा उच्चांक गाठला असून शासनाच्या तिजोरीत तब्बल १,०९५ कोटी २१ लाख ७१ हजार ४६० रुपये जमा केले आहेत.
पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये २०२४ मध्ये तब्बल १ लाख ९१ हजार ९८३ विविध वाहनांची नोंदणी झाली आहे. वाहन नोंदणीसह विविध टॅक्समधून आरटीओला १,०९५ कोटी २१ लाख ७१ हजार ४६० एवढा महसूल मिळाला आहे. उल्लेखनीय बाब अशी चार वर्षांत आरटीओचे एकूण उत्पन्न दुप्पट झाले आहे. २०२१ मध्ये आरटीओला ५९२ कोटींचे उत्पन्न मिळाले होते.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपयशी
पिंपरी-चिंचवड शहर उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. राज्यासह परराज्यातून मोठा कामगार वर्ग रोजगाच्या शोधात शहरात येत असतो. पिंपरी-चिंचवडसह चाकण एमआयडीसी, हिंजवडी आयटी पार्क व विविध सेवा क्षेत्रातील कामगार वर्ग शहराच्या उपनगरात वास्तव्यास आहे. उपनगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वाहन खरेदीकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत असून रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत भर पडत आहे.
वर्षानिहाय आरटीओला मिळालेला महसूल
२०२४ : १०९५ कोटी २१ लाख ७१,४६०
२०२३ : ९७८ कोटी १९ लाख ८८,१५२
२०२२ : ८२२ कोटी २० लाख ६३,४५४
२०२१ : ५९२ कोटी ०९ लाख ३३,६३७