पिंपरी-चिंचवडसाठी महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय होणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 09:09 IST2025-11-26T09:08:37+5:302025-11-26T09:09:11+5:30
- ग्रामीण भागासह औद्योगिक क्षेत्राकडून मागणी : पुण्यातील कार्यालयात जाण्यासाठी करावी लागते कसरत; शहर आणि परिसराच्या विस्ताराचा भार कसा पेलणार?

पिंपरी-चिंचवडसाठी महावितरणचे स्वतंत्र मंडल कार्यालय होणार का ?
गोविंद बर्गे
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील औद्योगिक क्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे. मात्र, या भागातील विजेच्या मोठ्या भारांच्या जोडणीसाठी मंजुरी, खांब आणि वाहिनीचे स्थलांतर आणि तत्सम कामांसाठी पुण्यातील कार्यालय गाठावे लागते. त्यामुळे महावितरणने भोसरी, पिंपरी, राजगुरुनगर आणि मावळ विभाग मिळून स्वतंत्र पिंपरी-चिंचवड मंडल कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या शहरात महावितरणची पिंपरी व भोसरी अशी दोन विभागीय कार्यालये आहेत. ही कार्यालये पुण्यातील गणेशखिंड मंडल कार्यालयाशी संलग्न आहेत. या दोन्ही विभागांत ग्राहकसंख्या झपाट्याने वाढत असून, सेवांवरील ताणही वाढत आहे. त्यामुळे सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकारही वाढत आहेत. त्याचा घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांना फटका बसत आहे. मावळ परिसराला महावितरणच्या राजगुरुनगर विभागीय कार्यालयातून सेवा पुरवली जाते. हे कार्यालय पुण्यातील रास्तापेठ मंडल कार्यालयाशी जोडलेले आहे. तेथे पोहोचण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राहकांना जास्त अंतर पार करावे लागते. यात वेळ आणि पैसा खर्च होत आहे.
या कामांसाठी गाठावे लागते पुण्यातील कार्यालय
लोणावळा येथून रास्ता पेठेतील कार्यालयाचे अंतर ६६ किलोमीटर, तर राजगुरुनगरपासून ४० किलोमीटर आहे. पिंपरी येथून गणेश खिंड महावितरण कार्यालयाचे अंतर १५ किलोमीटर आहे. या दोन्ही कार्यालयांत गृहसंकुले, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांना १५० किलोवॅटपेक्षा अधिक विद्युत भाराच्या कनेक्शनच्या मंजुरीसाठी, तसेच विद्युत खांब आणि वाहिनीचे स्थलांतर, उच्चदाब विद्युत वाहिन्यांशी संबंधित अन्य कामांसाठी जावे लागते.
पिंपरी-चिंचवडमध्ये महावितरणचे मंडल कार्यालय सुरू करावे. तेथे शहरातील दोन विभागांसह राजगुरुनगर विभागीय कार्यालयाचा समावेश करावा, अशी मागणी महावितरणचे मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक राजेंद्र पवार यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. -ॲड. गिरीश बक्षी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन.
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र मंडल कार्यालयाची मागणी तीन वर्षांपासून करीत आहे. कारण किरकोळ कामांसाठी गणेशखिंड आणि रास्ता पेठ कार्यालयात ये-जा करावी लागते. अधिकारी न भेटल्यास हेलपाटेही मारावे लागतात. - संतोष सौंदणकर, माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती.
गणेश खिंड येथील कार्यालयात जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागते. पार्किंगची समस्या भेडसावते. त्यामुळे लघुउद्योजकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शहरातच स्वतंत्र मंडल कार्यालय सुरू झाल्यास हा त्रास कमी होईल. महावितरणची कार्यक्षमताही सुधारेल. - नितीन गट्टानी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड प्लास्टिक असोसिएशन.