शहरातील नद्यांचे पात्र धोक्याच्या पातळीपेक्षा सहा ते सातपट प्रदूषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:33 IST2025-10-01T12:32:47+5:302025-10-01T12:33:10+5:30
- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धक्कादायक अहवाल : देशातील सर्वाधिक ५४ प्रदूषित नद्या महाराष्ट्रात; पवना नदीचा सर्वाधिक ३१ मिग्रॅ/लि बीओडीची नोंद

शहरातील नद्यांचे पात्र धोक्याच्या पातळीपेक्षा सहा ते सातपट प्रदूषित
- आकाश झगडे
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहराला गंभीर जलप्रदूषणाचा विळखा बसला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. शहरातील पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा सहा ते सातपट प्रदूषित झाल्या आहेत. अनेक ठिकाणी सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने, पाण्यातील जैविक ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
शहरातील नद्यांची स्थिती गंभीर
शहराची जीवनवाहिनी मानली जाणारी पवना नदी सर्वाधिक प्रदूषित आढळली आहे. या पात्रात २०.१ ते ३० मिग्रॅ/लि. यादरम्यान तर सर्वाधिक ३१ मिग्रॅ/लि ‘बीओडी’ नोंदवण्यात आला आहे. २०२२ मधील अहवालानुसार पवना नदीचा सर्वाधिक २६ मिग्रॅ/लि. ‘बीओडी’ नोंदवला होता. यात तब्बल ५ मिग्रॅ/लि. वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीत १०.१ ते २० मिग्रॅ/लि. बीओडी नोंदवण्यात आला. गत अहवालात तो १५.५ मिग्रॅ/लि. होता. मुळा नदी पात्रात २०.१ ते ३० मिग्रॅ/लि. यादरम्यान तर सर्वाधिक २५ मिग्रॅ/लि बीओडी नोंदवला आहे. २०२२ मध्ये सर्वाधिक बीओडी २८ मिग्रॅ/लि. होता. गेल्या काही वर्षात नदी प्रदूषण धोक्याच्या पातळीच्या खूप वर आहे.
‘बीओडी’ म्हणजे काय ?
‘बीओडी’ म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. हे जलप्रदूषणाचे मापन करण्याचे मानक आहे. कोणत्याही जलसाठ्यात सांडपाणी, औद्योगिक कचरा किंवा इतर सेंद्रिय पदार्थ मिसळतात, तेव्हा त्यातील जीवाणू आणि सूक्ष्मजंतू या सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. पिण्याच्या पाण्यासाठी बीओडी १ मिग्रॅ/लि.पेक्षा कमी असावा. बीओडी ३ मिग्रॅ/लि.पेक्षा कमी असणारे पाणी स्नानासाठी, जलचर जीवनासाठी योग्य असते. बीओडी ३ मिग्रॅ/लि.पेक्षा जास्त असलेले नदीपात्र प्रदूषित मानले जाते. बीओडी ३० मिग्रॅ/लि.पेक्षा जास्त असलेले पात्र सर्वाधिक प्रदूषित असते.
कमी प्रदूषित नद्यांच्या श्रेणीमध्ये शहरातील नद्यांना समाविष्ट करण्यासाठी महापालिकेच्या सहायाने प्रयत्नशील आहोत. यासाठी अधिकाधिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प वाढवण्यावर भर आहे. - मंचक जाधव, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ.