तळ्यात-मळ्यात न करता ठाम राहा..! अजित पवारांनी कोणाचे कान टोचले ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:55 IST2025-04-10T12:54:31+5:302025-04-10T12:55:54+5:30
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार; एकाच ठिकाणी राहिलात तर पद देण्याचे स्पष्टीकरण

तळ्यात-मळ्यात न करता ठाम राहा..! अजित पवारांनी कोणाचे कान टोचले ?
पिंपरी : तळ्यात-मळ्यात अशी भूमिका घेऊ नका. एकाच मतावर ठाम राहा. एकाच ठिकाणी राहिलात तर तुम्हाला अण्णा बनसोडे यांच्यासारखे पद मिळेल. तळ्यात-मळ्यात भूमिका नेहमी घेत राहिलात तर कोणीच विचारात घेत नाही आणि पदही देत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी भूमिका न घेणाऱ्या नेत्यांना लगावला.
विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार अण्णा बनसोडे यांचा काळेवाडी येथे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मंगला कदम, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक संदीप वाघेरे आदी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
अण्णा, सकाळी लवकर कामाला लागा!
अजित पवार सत्कार सोहळ्यात अण्णा बनसोडे यांचे कान टोचत म्हणाले, “अण्णा म्हणजे मूर्ती लहान, पण कीर्ती महान; पण अण्णा, आता जुन्या सवयी सोडा, सकाळी लवकर कामाला लागा. लोकांना वेळ द्या. तुमच्यासोबत तुमच्या सगळ्या कुटुंबाकडे आता सगळ्यांचे बारीक लक्ष राहणार आहे. मी माझ्या चिरंजीवालाही सांगतो. जेवढे महत्त्वाचे पद, तेवढे जास्त कष्ट घ्यावे लागतात. सर्वांना न्याय देण्यासाठी काम करा. कोणताही शिक्का बसवून घ्यायचा नाही.”
रस्ते छोटे करून चालणार नाही...
अजित पवार म्हणाले की, शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी जमीनमालकांना जास्त दर देऊन जमिनींची खरेदी केली जात आहे. अर्बन स्ट्रीटमधून रस्ते छोटे करून चालणार नाही. मात्र, रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन बसस्थानक, रेल्वेस्टेशनच्या परिसरात जादा एफएसआय देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांनाही प्रोत्साहन देत आहे. शहरातील नदी सुधार आणि रस्ते विकासात काही चुका प्रशासनाकडून होत असतील तर त्या सुधारल्या जातील. पोलिसांनाही कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अजितदादांमुळे वारंवार काम करण्याची संधी : अण्णा बनसोडे
नागरी सत्काराला उत्तर देताना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, राजकीय क्षेत्रात काम करताना कोणाचा तरी वरदहस्त असावा लागतो. अजितदादांचा वरदहस्त मला लाभला. त्यांनी मला काम करण्याची वारंवार संधी दिली. माझ्या कामाची पावती त्यातून दिली. शहरात सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत राहिलो. संघर्ष करीत पुढे आलेल्या कार्यकर्त्याला मानाचे पद महायुतीच्या माध्यमातून मिळाले. त्याचा शहरासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी उपयोग करणार आहे.