पिंपरीत टोळक्यांचा धुमाकूळ ; वाहन तोडफोडीच्या घटनांनी शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 13:29 IST2020-11-04T13:27:16+5:302020-11-04T13:29:20+5:30
पिंपरीत हुल्लडबाजी करून दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्यांकडून सातत्याने असे गुन्हे केले जात आहेत...

पिंपरीत टोळक्यांचा धुमाकूळ ; वाहन तोडफोडीच्या घटनांनी शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण
नारायण बडगुजर -
पिंपरी : यंदा जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात वाहन तोडफोडीचे 27 गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी विविध गुन्ह्यांत 126 आरोपींना अटक केली आहे. असे असतानाही टोळक्यांकडून तोडफोडीचे सत्र सुरूच आहे.त्यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हुल्लडबाजी करून दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्यांकडून सातत्याने असे गुन्हे केले जात आहेत.
पोलीस आयुक्तालय कार्यान्वित होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांसह वाहन तोडफोडीचे तसेच वाहने पेटविण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. 15 ऑगस्ट 2018 रोजी पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यानंतर या प्रकारांना आळा बसेल, अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. मात्र, याप्रकारचे गुन्हे सातत्याने होत आहेत. वाहन तोडफोडीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. पिंपरी-चिंचवड आणि वाहनांची तोडफोड हे जणू समीकरण झाल्यासारखेच आहे. यातील कारण तेवढे बदलत राहते. किरकोळ कारणातून, जुन्या वादातून, दोन गटातील भांडणातून, वर्चस्वासाठी तर कधी दहशतीसाठी ही तोडफोड होत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.
100 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
गेल्या आठवड्यात पिंपरीतील नेहरूनगर येथे किरकोळ कारणावरून 100 जणांच्या टोळक्याने धुडगूस घालून वाहनांची तोडफोड केली. रहाटणी येथेही टोळक्याने तोडफोड केल्याचा प्रकार घडला. एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे हे प्रकार घडत आहेत. अल्पवयीन मुलांचाही या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे दिसून येते. सातत्याने हे प्रकार होत असल्याने शहरवासीयामध्ये प्रचंड दहशत आहे. या हुल्लडबाज टोळक्यांचा शहरातील उपद्रव दिवसेदिवस वाढतच आहे.
कोयत्याचा होतोय सर्रास वापर
बहुतांश गुन्ह्यांमध्ये टोळके हातात हत्यारे घेऊन आर डाओरडा करून हुल्लडबाजी करतात. तसेच काही जणांवर जीवघेणा हल्ला करतात. अशा गुन्ह्यांमध्ये तलवारीवकोयत्यांचा सर्रास वापर होत आहे. कोयत्याने वार करून तसेच कोयते हवेत फिखून दहशत निर्माण केली जाते.
........
गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. आपापसातील भांडणातून तोडफोडीचे प्रकार होत आहेत, असे असले तरी यातील गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यापुढे असे गुन्हे करण्यास कोणीही धजावू नये यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
-आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त