Pimpri Chinchwad :काळाने आमच्या मुलांचा घात केला म्हणत कुटुंबियांनी फोडला हंबरडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 09:42 IST2026-03-20T09:41:14+5:302026-03-20T09:42:01+5:30
- राजस्थानातील अपघातात मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह विमानातून आणून अंत्यसंस्कार

Pimpri Chinchwad :काळाने आमच्या मुलांचा घात केला म्हणत कुटुंबियांनी फोडला हंबरडा
पिंपरी : पर्यटनासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तीन तरुणांचा राजस्थानमध्ये बुधवारी (दि. १८ मार्च) अपघातात मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह विमानाने गुरुवारी (दि. १९ मार्च) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुणाल किरण चोरडिया (रा. चिंचवडगाव), मयुरेश पांडुरंग पाडाळे (रा. म्हाळुंगे पाडाळे, ता. मुळशी), सिद्धांत रमेश आल्हाट (रा. आल्हाटवस्ती, वाकड) अशी मृत्यू झालेल्या तीन तरुणांची नावे आहेत. शहरातील काही तरुण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तीन कारमधून लेह-लडाख येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून परत येत असताना राजस्थानात कोटा शहराजवळ केथून पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-दिल्ली महामार्गावर एका कारला अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती मिळताच नातेवाईक केथून येथे गेले. तेथून दिल्ली येथे मृतदेह नेण्यात आले. दिल्ली येथून गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विमानाने मृतदेह शहरात आणण्यात आले. दुपारी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात मृतदेह आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर तिघांचे मृतदेह घरी नेऊन दुपारी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुणाल चोरडिया याच्यावर काळेवाडी स्मशानभूमी, सिद्धांत आल्हाट याच्यावर वाकड गावठाणातील स्मशानभूमी आणि मयुरेश पाडाळे याच्यावर म्हाळुंगे पाडाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी या दु:खद प्रसंगाने वातावरण शोकाकुल झाले होते. तिघांचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबियांना दु:ख अनावर झाले होते.
तिघांच्या मित्रांची घालमेल
कुणाल, मयुरेश आणि सिद्धांत यांनी महाविद्यालयीन शिक्षण नुकतेच पूर्ण केले होते. त्यांचे महाविद्यालयीन तसेच शालेय मित्र अंत्यसंस्कारावेळी आले होते. तिघांचे मृतदेह सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आणले. त्यावेळी मित्रही तेथे आले होते. त्यानंतर तिघांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. तिघांनाही एकाचवेळी अखेरचा निरोप कसा द्यावा, अशी त्यांच्या मित्रांची घालमेल सुरू होती. काहींना भावना अनावर झाल्या.
कुटुंबियांनी फोडला हंबरडा
तिघांचे मृतदेह आल्यानंतर कुटुंबातील महिलांनी हंबरडा फोडला. सणासुदीत काळाने घाला घातला, काळाने आमचा घात केला, असे म्हणत पालकांनी भावनांना वाट करून दिली. त्यामुळे वातावरण शोकमय झाले होते