गुन्हा करताना कोणताही पुरावा सोडला नाही, तरीही पोलिसांनी ओळखली चोरट्याची ‘चाल’
By नारायण बडगुजर | Updated: August 21, 2025 13:47 IST2025-08-21T13:46:18+5:302025-08-21T13:47:27+5:30
- महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने चार महिने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून सूक्ष्म निरीक्षणे नोंदवून केला कौशल्यपूर्वक तपास

गुन्हा करताना कोणताही पुरावा सोडला नाही, तरीही पोलिसांनी ओळखली चोरट्याची ‘चाल’
पिंपरी : कधीकधी गुन्हेगार मागे ठसा सोडून जात नाही; पण एक छोटीशी सवय, एक विशिष्ट लकब पोलिसांच्या हुशारीपुढे लपून राहत नाही. अशीच कहाणी आहे, महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी उलगडलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याची. ज्यात गुन्हेगाराने मोठ्या चलाखीने पुण्यातील खेड तालुक्यात घरफोडी करत तब्बल १८ लाखांचे दागिने लंपास केले; पण टी-शर्ट आणि चालण्याच्या लकबीने त्याचा पर्दाफाश झाला.
दिवस होता २० सप्टेंबर २०२४ चा. सकाळचे साडेअकरा ते सव्वाबाराची वेळ. खेड तालुक्यातील कुरुळी गावातील एका घरात सर्वजण कामानिमित्त बाहेर गेलेले. त्यावेळी एका अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडले आणि कपाटातील २६ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
चार महिने शोधमोहीम
तपासाची खरी सुरुवात झाली, ती परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून. यात एका व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटत होती. चेहरा स्पष्ट नव्हता; पण एक गोष्ट तपास पथकाच्या नजरेत भरली. संशयित चोरटा विशिष्ट प्रकारे चालत होता. साधा टी-शर्ट, अनोखी चाल आणि थोडीशी असामान्य शरीरयष्टी एवढ्यावरूनच गुन्हेगाराचा माग घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी अनेक दिवस सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. संशयिताच्या चालण्याच्या लकबीनुसार पुणे परिसरात अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. तरीही चार महिने कोणतीही खात्रीशीर माहिती मिळत नव्हती. तपास अधिक खोलात गेला. प्रत्येक लहानशा ‘क्लू’वर काम सुरू राहिले.
चाल ओळखली अन् मुसक्या आवळल्या
तपास पथकातील पोलिस १४ जानेवारी २०२५ रोजी चिखली-मोशी येथील स्पाइन रोड परिसरात परेडवरून परतत होते. त्यावेळी पथकातील पोलिस अंमलदार गणेश गायकवाड यांना एक व्यक्ती दिसली. घरफोडीतील संशयित चोरट्याची विशिष्ट चाल होती, अगदी त्याच चालण्याच्या लकबीसह! त्यानंतर पथकाने संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.
नेपाळ सीमेजवळ दुर्गम भागात विकले दागिने
अतिशय कौशल्यपूर्ण चौकशीनंतर संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, चोरलेले दागिने त्याने थेट बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातील नेपाळ सीमेजवळील दुर्गम भागात विकल्याचे समोर आले. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलिस अंमलदार विठ्ठल वडेकर, राजेश गिरी, अमोल माटे यांनी थेट बिहार गाठले. नेपाळ सीमेवर असलेल्या दुर्गम भागात जाऊन त्यांनी दागिने खरेदी करणाऱ्या व्यक्तीसही ताब्यात घेतले.
नेपाळ सीमेवरून ताब्यात घेतलेला संशयित गुन्ह्याची कबुली देत नव्हता. पथकाने खाक्या दाखवल्यानंतर तो बोलू लागला. चौकशीनंतर दोघांकडून १८ लाखांचे २६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्यानंतर मूळ मालक असलेल्या कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर झाले. पोलिसांनी ही कारवाई उघडकीस आणताना कौशल्यपूर्वक तपास केला. संशयित चोरट्याची ‘चालण्याची लकब’ या एकदम सूक्ष्म तपशिलावरून त्याच्यापर्यंत तपास पथक पोहोचले. - नितीन गिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक