सोमाटणे फाटा अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू; भरधाव कंटनेरने धडक दिल्याने घडली होती घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:43 IST2026-02-13T12:43:25+5:302026-02-13T12:43:35+5:30
- तळेगाव दाभाडेकडून शिरगावकडे दुचाकीने जात असताना भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिली होती.

सोमाटणे फाटा अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू; भरधाव कंटनेरने धडक दिल्याने घडली होती घटना
शिरगाव : सोमाटणे फाटा येथे मंगळवारी (ता. १०) रात्री घडलेल्या भीषण अपघातातील गंभीर जखमी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राची राजू सोरटे (वय २०, रा. शिरगाव) हिचे बुधवारी रात्री सुमारे ११ वाजता सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे.
मंगळवारी रात्री सुमारे ८:५५ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडेकडून शिरगावकडे दुचाकीने जात असताना भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिली होती. या भीषण अपघातात दुचाकीस्वार एस. के. मनिरूल (वय २२, मूळ गाव हावडा, पश्चिम बंगाल; सध्या रा. तळेगाव दाभाडे) याचा जागीच मृत्यू झाला होता, तर मागे बसलेली प्राची गंभीर जखमी झाली होती.
तिच्या पायावरून कंटेनरचे चाक गेल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती. अपघातानंतर तिला तत्काळ सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिची प्रकृती सुधारली नाही आणि बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला. प्राचीच्या निधनाने शिरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.