स्मार्ट मीटरमुळे वितरण व्यवस्थेचा वेग वाढणार की ग्राहकांच्या अडचणी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 20:18 IST2026-02-24T20:17:44+5:302026-02-24T20:18:06+5:30
- महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका; थकबाकीदारांवर कारवाई, ग्राहकांचा त्रागा

स्मार्ट मीटरमुळे वितरण व्यवस्थेचा वेग वाढणार की ग्राहकांच्या अडचणी ?
पिंपरी : शहरात स्मार्ट वीज मीटर प्रणालीचा विस्तार वेगाने वाढत आहे. नवीन स्मार्ट मीटर बसविताना जुन्या ग्राहकांना महावितरणने दणका देण्यास सुरुवात केली आहे. थकबाकीदार ग्राहकांविरोधात महावितरणने कठोर भूमिका घेतली आहे. मुदतीत वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा आता सिस्टीमद्वारे स्वयंचलित पद्धतीने (ऑटोमॅटिक) बंद केला जात आहे. त्यामुळे महावितरणचे स्मार्ट ग्राहक मात्र यामुळे त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी वीज बिल भरूनही वेळेत वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. या प्रणालीमुळे थकबाकीदारांवर थेट आणि तत्काळ कारवाई करणे शक्य झाले आहे. संबंधित ग्राहकांना आधी एसएमएसद्वारे थकबाकीची सूचना दिली जाते. मात्र, दिलेल्या मुदतीत बिल न भरल्यास वीजपुरवठा कार्यालयातून कर्मचारी पाठविण्याऐवजी ऑनलाइन प्रणालीद्वारे बंद केला जातो.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक स्मार्ट मीटरमध्ये दूरसंचार कंपनीचे सीमकार्ड बसविण्यात आले आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे मीटर थेट केंद्रीय यंत्रणेशी जोडलेले राहतो. तसेच वीजपुरवठा ऑनलाइन पद्धतीने बंद किंवा सुरू करता येतो. ग्राहकाने थकबाकी ऑनलाइन भरल्यानंतर साधारण एक ते दोन तासांत वीजपुरवठा आपोआप पूर्ववत होतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, वीज बिल भरूनही वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी एक-दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे ग्राहक सांगत आहेत.
मात्र, अनेक ठिकाणी मीटरवरील दिवा सुरू असतानाही घरातील वीजपुरवठा अचानक बंद झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अचानक वीज खंडित झाल्यामुळे घरगुती कामकाज, ऑनलाइन व्यवसाय, तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विशेषतः सकाळच्या वेळेत वीज खंडित झाल्यामुळे काही भागांत गैरसोय झाल्याचे नागरिकांनी सांगितले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई नियमानुसार असल्याचे स्पष्ट करीत, स्मार्ट मीटरमुळे थकबाकी नियंत्रणात ठेवणे, पारदर्शकता वाढविणे आणि मनुष्यबळाची बचत करणे शक्य होत असल्याचा दावा केला आहे. नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.