चिखलीत पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने हजारो सदनिकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:49 IST2025-09-26T11:49:12+5:302025-09-26T11:49:33+5:30
- भर सणासुदीत नागरिकांचे पाण्यावाचून हाल : चिखली, घरकुल, तळवडे परिसरावर परिणाम, ठेकेदार, प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे सामान्यांना नाहक त्रास

चिखलीत पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने हजारो सदनिकांना फटका
चिखली : महापालिका प्रशासनाकडून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, विकास कामांसाठी रस्ते खोदाई करताना अनेकदा भूमिगत जलवाहिन्या फुटून पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. अशाप्रकारे निगडीत भूमिगत जलवाहिनी फुटल्याने त्याचा परिणाम चिखली, घरकुल, तळवडे परिसरासह महापालिकेच्या संपूर्ण फ प्रभागाचा पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
महापालिका प्रशासनाकडून विकास कामांसाठी रस्त्यांची खोदाई करताना भूमिगत जलवाहिन्या व विद्युत तारांची काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, या कामात संबंधित ठेकेदार व प्रशासकीय यंत्रणेकडून हलगर्जीपणा केला जात असल्याने अशा समस्यांचा नागरिकांना नाहक मनस्ताप होतो. भर सणासुदीत पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने हजारो घरांना याचा फटका बसला.
पाणी सोडण्याच्या निश्चित वेळा नाहीच
एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असूनही महापालिका प्रशासनाकडून पाणी सोडण्याच्या वेळा निश्चित पाळल्या जात नाहीत. पाणीदेखील पुरेशा दाबाने सोडले जात नसल्याच्या प्रतिक्रिया चिखलीतील महिलांनी व्यक्त केल्या.
निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात भूमिगत असलेली मोठी जलवाहिनी मेट्रोच्या खोदकामात फुटली आहे. दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. तरीही दोन दिवस पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. - जयकुमार गुजर, उप अभियंता, पाणी पुरवठा ‘फ’ प्रभाग
विस्कळीत व कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा ही समस्या वारंवार निर्माण होत आहे. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनदेखील कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. खोदकाम करताना पुरेशी काळजी न घेतल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. - नीलेश नेवाळे, सामाजिक कार्यकर्ते