प्रभाग लोकसंख्या ४९ ते ५९ हजार; २०१७ च्या प्रभागांत काहीसा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:05 IST2025-06-13T10:02:09+5:302025-06-13T10:05:03+5:30

- महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्यीय पद्धतीच्या प्रभाग रचनेकरिता तयारी झाली सुरू : राज्य शासनाने आदेश दिल्यानंतर पालिका निवडणूक विभाग लागला कामाला, कर्मचाऱ्यांची बैठक

pimpari-chinchwad Ward population 49 to 59 thousand; slight change in wards of 2017 | प्रभाग लोकसंख्या ४९ ते ५९ हजार; २०१७ च्या प्रभागांत काहीसा बदल

प्रभाग लोकसंख्या ४९ ते ५९ हजार; २०१७ च्या प्रभागांत काहीसा बदल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची २०१७ मधील चार सदस्यीय पद्धतीची प्रभाग रचना तयार आहे. आगामी निवडणूक याच पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे २०१७ च्या प्रभाग रचनेत थोडेसे बदल केले जातील. प्रभाग रचना कायम राहणार असल्याने एका प्रभागात ४९ ते ५९ हजार लोकसंख्या असण्याचीही शक्यता निवडणूक विभागातील सूत्रांनी वर्तवली आहे.

महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपला. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम, राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, ओबीसी आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा अशा विविध कारणांमुळे निवडणूक तीन वर्षांपासून लांबणीवर पडली होती. राज्य शासनाने मंगळवारी प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानंतर निवडणूक विभाग कामाला लागला आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आढावा घेतला. अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक झाली. प्रभाग रचनेबाबत चर्चा करत प्रगणक गटाची मांडणी करून प्रारूप प्रभाग रचनेला सुरुवात होणार आहे.

या कर्मचाऱ्यांचा असणार समावेश

प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकाऱ्यांचा समावेश करावा, असे आदेशात नमूद केले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९ आहे. त्यानुसार ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत १७ लाख लोकसंख्येसाठी महापालिकेत १२८ नगरसेवक आणि ३२ प्रभाग होते. त्याप्रमाणे यावेळीही तेवढेच असणार आहेत.
 
प्रभाग रचनेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये जुंपणार?

२०१७ च्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना भाजपने पक्षासाठी फायद्याची ठरणारी आणि सोयीने प्रभागरचना केल्याचा आरोप झाला होता. महामार्ग, मुख्य रस्ते, गल्ल्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. त्यामुळे त्या प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना आल्या होत्या. मात्र, हरकती आणि सूचनांना निवडणूक विभागाने केराची टोपली दाखवली. यावेळी प्रभाग रचनेवरून महायुतीतील भाजप-राष्ट्रवादीमध्येच जुंपण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
 
२०१७ मधील पक्षीय बलाबल

भाजप - ७७
राष्ट्रवादी काँग्रेस - ३६
शिवसेना - ९
मनसे - १
अपक्ष - ६

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी वेळ, मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना करण्यात येणार असून, एका प्रभागात ४९ ते ५९ हजार लोकसंख्या असण्याची शक्यता आहे. - अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, महापालिका

Web Title: pimpari-chinchwad Ward population 49 to 59 thousand; slight change in wards of 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.