पाऊस आला धावून, उद्योगनगरीतील रस्ते गेले वाहून..!प्रशासन म्हणतंय पाऊस उघडल्यावर खड्डे दुरुस्तीचे पाहू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:05 IST2025-06-01T16:04:03+5:302025-06-01T16:05:24+5:30

महापालिका झटकतेय हात : पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर खोदकाम करू नये, असा आदेश काढला असतानाही खोदकाम सुरूच; विद्युत, ड्रेनेज, पाणीपुरवठा, महामेट्रो, स्थापत्य विभागाकडून खोदाई कायम; खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून चिखल, दररोज होताहेत छोटे-मोठे अपघात  

pimpari-chinchwad The rain came rushing in, the roads in the industrial city were washed away..! The administration says that the potholes will be repaired when the rains stop. | पाऊस आला धावून, उद्योगनगरीतील रस्ते गेले वाहून..!प्रशासन म्हणतंय पाऊस उघडल्यावर खड्डे दुरुस्तीचे पाहू

पाऊस आला धावून, उद्योगनगरीतील रस्ते गेले वाहून..!प्रशासन म्हणतंय पाऊस उघडल्यावर खड्डे दुरुस्तीचे पाहू

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून चिखल होत आहे. खड्यांचा अंदाज न आल्याने वाहनचालक गोंधळून जात आहेत. खड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. पाऊस असल्याने सध्या तरी खड्यांची दुरुस्ती केली जाणार नाही, असे महापालिकेने सांगत हात झटकले आहेत.

पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर खोदकाम करू नये, असा आदेश महापालिकेने काढला होता. मात्र, १५ मे नंतरही शहरातील काही भागांत खोदकाम सुरूच आहे. पाणीपुरवठा, विद्युत, ड्रेनेज, स्थापत्य, शहरी दळणवळण, स्मार्ट सिटी, इतर काही विभागांकडून तसेच, महामेट्रोकडून रस्ते व पदपथ खोदाई कायम आहे. मोशी, तळवडे, रावेत, किवळे, चिखली, आकुर्डी, थरमॅक्स चौक, देहू-आळंदी रस्ता, भोसरी, दळवीनगर, चिंचवड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोडी, सांगवी, कासारवाडी, निगडी, प्राधिकरण, पिंपरी, काळेवाडी, रहाटणी, एमआयडीसी भागांत रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहेत.

मे महिन्याच पाऊस पडल्याने महापालिका हैराण...

महापालिकेच्या वतीने दरवर्षी पहिला पाऊस पडल्यानंतर जूनच्या १५ तारखेनंतर रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली जाते. डांबरीकरण, काँक्रीट, पेव्हिंग ब्लॉकद्वारे खड्डे बुजविले जातात. मात्र, यंदा मे महिन्यातच मुसळधार पाऊसासह मान्सून सुरू झाल्याने महापालिका प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे. तत्काळ रस्ते दुरुस्ती कशी करायची, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. बदलेल्या मॉन्सूनमुळे महापालिकेचे दरवर्षीचे धोरण बदलावे लागणार नाहीत.

ग्रेड सेपरेटरमध्येही कामे सुरू

ग्रेड सेपरेटरमध्ये नाशिक फाटा तसेच निगडी परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे सिग्नल टाळून ग्रेड सेपरेटरमधून थेट देहूरोडला निघण्याचा विचार करणाऱ्या वाहनचालकांना ग्रेड सेपरेटरमधून प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात अवजड वाहनांमुळे कोंडीमध्ये भर पडत आहे.  

नव्याकोऱ्या रस्त्याची पुन्हा केली खोदाई

कासारवाडी येथील शंकरवाडी रस्त्याचे मागील एक वर्षापासून सुरू असलेले काम नुकतेच पूर्ण झाले होते. तोच महापालिकेकडून या नव्याकोऱ्या रस्त्याची दुरुस्तीसाठी पुन्हा खोदाई केली.

ग्रेडसेपरेटर मार्गावर मेट्रोकडून खड्डे

महामेट्रोच्या कामामुळे दापोडी ते कासारवाडी मार्गावरील ग्रेडसेपरेटर मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चांगले काँक्रिटवे रस्त्यांना भेगा पडल्या. अनेक ठिकाणी खड्डे पडले. २ काँक्रीटचे रस्ते दुरुस्त करण्याचे काम महामेट्रोकडून शंकरवाडी, कासारवाडी येथे सुरू कासव गतीने सुरू आहे. त्यासाठी ग्रेडसेपरेटरमधील एक लेन वाहतुकीस बंद केली आहे. त्यामुळे तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. तसेच, पिंपरी मेट्रो स्टेशनच्या खाली काम सुरू असल्याने वाहतूक अडथळा होत आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहने घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पावसाने उघडीप दिल्याने गुरुवार (दि. २९) काही भागांतील रस्ते दुरुस्तीस सुरुवात करण्यात आली आहे. या पुढे पाऊस थांबल्यानंतर तातडीने दुरुस्ती काम केले जाईल. दरवर्षी हे दुरुस्ती कामाची सुरुवात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून केली जात होती. यंदा हे काम लवकर सुरू करण्यात आले आहे. - मकरंद निकम,शहर अभियंता, महापालिका 

Web Title: pimpari-chinchwad The rain came rushing in, the roads in the industrial city were washed away..! The administration says that the potholes will be repaired when the rains stop.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.