आळंदीत बोअरवेलमध्ये लालसर पाणी अन् नदीत फेस; भाविकांत भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 14:15 IST2026-02-22T14:14:18+5:302026-02-22T14:15:38+5:30
आळंदीमध्ये रासायनिक संकट; भूजलही धोक्यात ? प्रशासनाचे दावे हवेत

आळंदीत बोअरवेलमध्ये लालसर पाणी अन् नदीत फेस; भाविकांत भीती
आळंदी : पवित्र तीर्थक्षेत्र आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून, हे तीर्थक्षेत्र प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून नदीचे पात्र पांढऱ्या शुभ्र रासायनिक फेसाने माखलेले असून, परिसरात पसरलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हे प्रदूषण आता जमिनीखालील जलस्रोतांपर्यंत पोहोचले असून, काही परिसरांतील बोअरवेलमधून लालसर आणि फेसाळ पाणी येऊ लागल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नदीकाठच्या गावांतून येणारे प्रक्रिया न केलेले मैलामिश्रित सांडपाणी आणि औद्योगिक पट्ट्यातून सोडले जाणारे घातक रासायनिक पाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदीच्या परिसंस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यक्षम असल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येत आहे.
आळंदीतील अन्नपूर्णा मातानगर परिसरात काही नागरिकांच्या बोअरवेलमधून लालसर रंगाचे आणि उग्र वास असलेले फेसाळ पाणी येत असल्याचे समोर आले आहे. या पाण्याचा वास इंद्रायणीतील दूषित पाण्यासारखाच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे भूजल प्रदूषणाची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पर्यावरणप्रेमींचा संताप; कठोर कारवाईची मागणी
इंद्रायणीच्या या दुरवस्थेमुळे वारकरी संप्रदाय आणि पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने केवळ पाहणी न करता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औद्योगिक आस्थापनांवर आणि सांडपाणी थेट नदीत सोडणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
त्वचाविकाराची भीती
इंद्रायणीच्या पवित्र जलात स्नान करण्यासाठी भाविक दुरून येतात. मात्र, सध्या नदीची झालेली अवस्था पाहून भाविक हताश झाले आहेत. रसायनांच्या फेसामुळे त्वचाविकारांची भीती आणि परिसरात पसरलेली दुर्गंधी यामुळे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
“नदीची आणि भूजलाची ही अवस्था पाहून भीती वाटत आहे. संबंधित विभागाने तातडीने या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून प्रदूषणाचे मूळ शोधून काढावे. अन्यथा आळंदीत साथीचे रोग पसरायला वेळ लागणार नाही.” -संजय घुंडरे, स्थानिक नागरिक
“आम्ही माउलींच्या दर्शनासाठी येतो तेव्हा इंद्रायणीमध्ये स्नान करतो. पण आता नदीकडे बघवतही नाही. हे पाणी आहे की विष, असा प्रश्न पडतो. प्रशासनाने तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल.” -विठ्ठल आबणे, वारकरी