अशी ही बदलाबदली...! रावेत, वाल्हेकरवाडीतील एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागाच्या यादीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:04 IST2025-11-25T16:03:04+5:302025-11-25T16:04:39+5:30
- प्रभाग १६ मधील तब्बल चार हजार मतदारांची नावे चुकून प्रभाग १७ मध्ये : उलटसुलट बदलांबद्दल नागरिकांमध्ये संताप अन् संभ्रम, काही ठिकाणी संपूर्ण सोसायटीचे नावासह दुसऱ्या प्रभागात, तफावतीमुळे प्रभागातील उमेदवारांचे गणित कोलमडले, प्रशासनावर तक्रारींचा पाऊस

अशी ही बदलाबदली...! रावेत, वाल्हेकरवाडीतील एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागाच्या यादीत
- अतुल क्षीरसागर
रावेत :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीत निवडणूक प्रशासनाने नुकतीच सर्व प्रभागांची प्रारूप मतदार यादी जाहीर केली. मात्र, यादी जाहीर होताच रावेत (प्रभाग १६), वाल्हेकरवाडी (प्रभाग १७) परिसरात अनपेक्षित गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. मतदार यादीतील गंभीर तफावतीमुळे दोन्ही प्रभागांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
रावेतचे चार हजार मतदार वाल्हेकरवाडीत....
प्रारूप यादीचे बारकाईने परीक्षण केल्यानंतर रावेत प्रभाग क्रमांक १६ मधील तब्बल चार हजारांहून अधिक मतदारांचे नाव चुकून वाल्हेकरवाडी (प्रभाग १७) या शेजारील प्रभागात स्थानांतरित झाल्याचे स्पष्ट झाले. यात अनेक हाउसिंग सोसायट्या, चाळी आणि मुख्य रस्त्यावरील रहिवाशांचा मोठा समावेश आहे.
वाल्हेकरवाडीचे दोन हजार मतदार रावेतमध्ये...
फक्त रावेतच नव्हे तर वाल्हेकरवाडी प्रभाग क्रमांक १७ मधील सुमारे दोन हजारांहून अधिक मतदारांचे नाव रावेत प्रभाग १६ मध्ये दिसून येत असल्याने हा गोंधळ अजूनच गडद झाला आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मतदार यादीतील या उलटसुलट बदलांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इच्छुकांचे गणित बिघडले; राजकीय हालचालींना वेग...
प्रभागनिहाय मतदारांची संख्या ही इच्छुक उमेदवारांसाठी निवडणूक नियोजनातील महत्त्वाचा घटक असतो. मात्र, यादीतील तफावतींमुळे दोन्ही प्रभागातील अनेक इच्छुकांचे राजकीय गणित कोलमडले आहे. मतदारसंख्या अचानक कमी-जास्त झाल्याने भक्कम मतदार वर्ग असलेल्या भागांचे गठ्ठे तुटल्याची भावना उमेदवार व्यक्त करत आहेत. यामुळेच प्रभाग १६ आणि १७ मधील माजी नगरसेवक, विद्यमान पदाधिकारी, विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेत्यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे धावपळ सुरू आहे. प्रशासनापुढे अर्ज, आक्षेप, सूचना दाखल करण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.
आक्षेप नोंदवण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत वेळ...
निवडणूक विभागाने प्रारूप मतदार यादीबाबत आक्षेप, दुरुस्त्या आणि सूचना स्वीकारण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे दोन्ही प्रभागातील उमेदवारांनी सर्वच सोसायट्या, वसाहती आणि विविध भागात आपले नाव योग्य प्रभागात आहे का? याची मोठी पडताळणी मोहीम उचलली आहे. काही स्थानिकांनी सांगितले की, आमचे नाव मागील तीन निवडणुकांपासून प्रभाग १६ मध्येच आहे. आता अचानक ते प्रभाग १७ मध्ये कसे गेले? अशा चुका झाल्या तर मतदानाच्या दिवशी मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. अपडेटसाठी निवडणूक केंद्रांमध्ये नागरिकांची वर्दळही वाढली आहे.
नागरिकांमध्ये संभ्रम; प्रशासनाकडे तक्रारींचा पाऊस...
मतदार यादीतील या गोंधळामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सोसायट्यांमधून, घरांमधून, नागरिक आणि हाउसिंग संस्थांकडून प्रशासनाकडे तक्रारींचा पाऊस पडतो आहे. काही प्रकरणांत संपूर्ण सोसायटीचे नावासह दुसऱ्या प्रभागात पाठवण्यात आली असल्याचेही समोर आले आहे.
सामान्यांचे प्रश्न आणि मागणी
- आमची रहिवासी माहिती, घर क्रमांक, पत्ते योग्य असूनही नाव चुकीच्या प्रभागात का?
- जर मतदानाच्या दिवशीही यादी दुरुस्त झाली नाही तर आमचा मतदानाचा हक्क हिरावला जाईल.
- प्रशासनाने तातडीने तपास करून आवश्यक दुरुस्ती करावी.
राजकीय समतोल बिघडण्याची शक्यता?
रावेत आणि वाल्हेकरवाडी हे दोन्ही प्रभाग वेगाने वाढणारे आणि घनदाट लोकसंख्येचे आहेत. मतदार संख्येतील बदल हे संपूर्ण निवडणूक समीकरण बदलू शकतात. कोणत्या भागातील मतदार कुठे सरकले यावरून पक्षांची रणनीती बदलण्याची शक्यता आहे. काही इच्छुकांसाठी ही तफावत राजकीय नुकसानकारक तर काहींसाठी अनपेक्षित फायदेशीर ठरू शकते.
त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
स्थानिक नेतृत्वाने निवडणूक विभागाकडे निवेदन देत या त्रुटी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे की सर्व आक्षेप वेळेत तपासून अंतिम यादीत योग्य दुरुस्त्या केल्या जातील. एकूणच प्रारूप मतदार यादीतील या तफावतीमुळे रावेत, वाल्हेकरवाडी परिसरात निवडणूकपूर्व गोंधळ निर्माण झाला आहे. आता सर्वांचे लक्ष २७ नोव्हेंबरनंतरच्या अंतिम यादीकडे लागले आहे.