ज्येष्ठ नागरिक दिन विशेष : वयाच्या ६९ व्या वर्षीही स्वच्छतेसाठी झपाटलेला अवलिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 11:05 IST2025-10-01T11:05:31+5:302025-10-01T11:05:56+5:30
- ‘स्वच्छता दूत’ यशवंत कण्हेरे यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा : ६६ दिवसांत स्वच्छतेचा संदेश देत महाराष्ट्र प्रदक्षिणा

ज्येष्ठ नागरिक दिन विशेष : वयाच्या ६९ व्या वर्षीही स्वच्छतेसाठी झपाटलेला अवलिया
- आकाश झगडे
पिंपरी : नद्यांचे घाट, रस्ते, शाळा, ग्रामपंचायती... अगदी सगळीकडे हातात झाडू आणि मनात स्वच्छतेचा ध्यास घेऊन सतत प्रवास करणाऱ्या संत गाडगेबाबांचा वारसा पिंपरी-चिंचवडच्या अवलियाने जपला आहे. बजाज कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर यशवंत गंगाराम कण्हेरे यांनी वयाच्या ६९ व्या वर्षीही स्वच्छता अभियानासाठी वाहून घेतले आहे.
कृती हाच संदेश देणारे कण्हेरे खऱ्या अर्थाने ‘स्वच्छतादूत’ ठरले आहेत. बजाज ऑटो कंपनीतून २००८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर संत गाडगेबाबांची पुस्तके त्यांच्या वाचनात आली. गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी जोमाने काम सुरू केले.
त्यांनी स्वच्छता कार्याला शहरापुरते किंवा राज्यापुरते मर्यादित ठेवलेले नाही. ते जिथे जातात, तो परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प पूर्ण करतात. त्यांनी काशी विश्वेश्वराला तीन वेळा भेट देऊन तेथील घाट स्वतः धुतले आहेत. अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी गेले असता तेथील रस्त्यांची स्वच्छता केली. रेल्वे किंवा एसटी बसने प्रवास करताना ते केवळ स्वतः स्वच्छता करत नाहीत, तर सहप्रवाशांनाही मार्गदर्शन करतात.
६६ दिवसांत ४,६१० किलोमीटरची महाराष्ट्र प्रदक्षिणा
कण्हेरे यांनी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी मोटारसायकलवर संपूर्ण महाराष्ट्राची धाडसी परिक्रमा सुरू केली. ६६ दिवसांत त्यांनी ३६ जिल्ह्यांमध्ये ४६१० किलोमीटरचा प्रवास केला. यादरम्यान रस्त्यातील शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन केले. १ मे २०२५ रोजी सांगता करताना चिंचवड येथील महात्मा फुले नगरवासीयांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले.
पायी नर्मदा परिक्रमा आणि वारीतील सेवा
५ डिसेंबर २०२३ ते १७ मार्च २०२४ या कालावधीत त्यांनी ३७०० किलोमीटरची पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. यादरम्यानही मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले. गेली ११ वर्षे आषाढी वारी करत स्वच्छता अभियान राबवतात. रस्त्यावर सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना स्वच्छता कशी राखावी याबद्दल प्रभावी मार्गदर्शन करतात.
महापालिकेचे स्वच्छता ब्रँड ॲम्बेसिडर
पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०२४ ते २०२५ दरम्यान त्यांची स्वच्छता ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली. शहराचा स्वच्छतेत प्रथम क्रमांक येण्यात त्यांचा वाटा होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
उघड्यावर कचरा टाकू नका. प्लॅस्टिक पिशवी वापरू नका. ओला-सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत टाका. स्वच्छता हा प्रत्येक माणसाचा स्वभाव असावा. - यशवंत कण्हेरे, ज्येष्ठ नागरिक