Pimpari-chinchwad : उद्योगनगरीत इंधन टंचाईची अफवा, धास्तीमुळे पंपांवर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:20 IST2026-03-28T13:19:09+5:302026-03-28T13:20:29+5:30

- पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याने अनेक पंप बंद : सकाळ-संध्याकाळी गर्दीत वाढ; नेहमीपेक्षा जास्त ग्राहक; पुरवठा नियमित असूनही जादा इंधन भरण्यामुळे जाणवतोय तुटवडा 

pimpari-chinchwad Rumors of fuel shortage in industrial city, queues of vehicles at pumps due to fear | Pimpari-chinchwad : उद्योगनगरीत इंधन टंचाईची अफवा, धास्तीमुळे पंपांवर वाहनांच्या रांगा

Pimpari-chinchwad : उद्योगनगरीत इंधन टंचाईची अफवा, धास्तीमुळे पंपांवर वाहनांच्या रांगा

पिंपरी : आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेमुळे उद्योगनगरीतील पेट्रोलपंपांवर सकाळ-संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागत आहेत. दोन-तीन दिवसांपासून पेट्रोल व डिझेलसाठी ग्राहकांची संख्या वाढली असून, इंधन संपल्याने अनेक पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी (दि. २७) सकाळी आणि संध्याकाळी शहरातील विविध भागांतील पेट्रोलपंपांवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली. काही पंपांवर तर रांगा लागल्या होत्या.

आकुर्डी भागात पंप बंद

आकुर्डी येथील इंडस्ट्रियल सर्व्हिस स्टेशन पंपावर मागील दोन दिवसांपासून सकाळी नऊ ते दुपारी १२ आणि सायंकाळी साडेपाच ते रात्री १० पर्यंत गर्दी होत असल्याचे पंप व्यवस्थापकाने सांगितले. आकुर्डी अजिंठानगर येथील अंबिका पेट्रोलियम पंपावर मागणी वाढल्याने मागील तीन-चार दिवसांपासून रात्री पेट्रोल आणि डिझेल संपत आहे. गुरुवारी हा पंप पूर्ण दिवस बंद होता. शुक्रवारी दुपारी दोन वाजता इंधन टँकर आल्यानंतरच पंप सुरू करण्यात आला.

लिंक रस्ता आणि चिंचवड

लिंक रस्त्यावरील गावडे पेट्रोलियम पंपावर दुपारी गर्दी नसली तरी, मागील दोन-तीन दिवसांपासून सकाळी आणि संध्याकाळी नेहमीपेक्षा जास्त ग्राहक येत असल्याचे सांगण्यात आले. चिंचवड येथील जयहिंद सर्व्हिस स्टेशन पंपावर सकाळी नऊनंतर आणि रात्री आठनंतर रांगा लागत असल्याचे व्यवस्थापक रवी शर्मा यांनी सांगितले.

खराळवाडी आणि मोरवाडी

खराळवाडी येथील एचपी ऑटो केअर पेट्रोलपंपावर ग्राहक संख्या १० टक्के वाढल्याचे पंप व्यवस्थापकाने सांगितले. मात्र, येथे वाहनांच्या लांब रांगा दिसून आल्या नाहीत. मोरवाडी येथील पिंपळे पेट्रोलपंपावरही पेट्रोल आणि डिझेलसाठी विशेष गर्दी नव्हती.

निगडी आणि संभाजीनगर

निगडी येथील श्री बालाजी पेट्रोलियम पंपावर दुपारी साडेतीनच्या सुमारास गर्दी नसली तरी, मागील दोन दिवसांपासून सकाळी आठ ते दुपारी एक आणि सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असल्याचे संचालक जय धुमाळ यांनी सांगितले. संभाजीनगर येथील टीसीआय इंडिया लिमिटेड पंपावर गुरुवारी सायंकाळी रांग लागली होती. शुक्रवारी दुपारी १२ वाजता इंधन संपल्याने पंप बंद ठेवावा लागला. या पंपाकडे दोन दिवसांचा साठा असतो. मात्र, अचानक ग्राहक वाढल्याने तो साठाही संपल्याचे व्यवस्थापक अजय मौर्य यांनी सांगितले.

काही ठिकाणी शांतता

दरम्यान, टाटा मोटर्सजवळील एफेक्सो लिमिटेड पंपावर दुपारी गर्दी नव्हती. मात्र, सायंकाळी नेहमीपेक्षा अधिक गर्दी झाली. तसेच पिंपरी संत तुकारामनगर येथील एचपी ऑटो केअर पेट्रोलपंपावर शुक्रवारी विशेष गर्दी दिसून आली नाही. 

अफवेमुळे ग्राहक अधिक इंधन भरून घेत असल्याने नेहमीपेक्षा जास्त खप होत आहे. यामुळे नियमित पुरवठा असूनही काही पंपांवर इंधन लवकर संपत आहे. प्रशासनाने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी आणि अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांत राहावे.  - ध्रुव रूपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डिलर असोसिएशन 

Web Title : पिंपरी-चिंचवड में ईंधन की कमी की अफवाहों से मची अफरा-तफरी

Web Summary : मध्य पूर्वेतील तणावामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेने पिंपरी-चिंचवडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक पेट्रोल पंपांवर मागणी वाढल्याने इंधन लवकर संपले आणि काही पंप बंद ठेवावे लागले. प्रशासनाने शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title : Fuel Shortage Rumors Cause Panic Buying in Pimpri-Chinchwad

Web Summary : Rumors of fuel scarcity due to Middle East tensions sparked panic buying in Pimpri-Chinchwad. Many petrol pumps faced increased demand, leading to fuel depletion and temporary closures. Authorities urge calm.