Power Outage: भोसरी, पिंपरीतील वीजपुरवठा पुन्हा विस्कळीत; महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रात पुन्हा बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:41 IST2026-02-18T11:40:57+5:302026-02-18T11:41:36+5:30
Pimpari-Chinchwad Bhosari Power Outage: पर्यायी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Power Outage: भोसरी, पिंपरीतील वीजपुरवठा पुन्हा विस्कळीत; महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रात पुन्हा बिघाड
पिंपरी :महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (महापारेषण)च्या भोसरी येथील २२० के. व्ही. अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रामध्ये रविवारी (दि. १५) रात्री अकराच्या सुमारास अंतर्गत बिघाड झाला. परिणामी, या रोहित्रावर अवलंबून असलेला सुमारे ८० एमव्हीएचा वीजभार बाधित झाला. त्यामुळे भोसरी व पिंपरी विभागातील अनेक भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला. पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
या बिघाडामुळे एस ब्लॉक, जे ब्लॉक, डी-२ ब्लॉक, एफ-२ ब्लॉक, टी ब्लॉक, इंद्रायणी नगर, भोसरी गाव, जलवायू विहार, गंधर्व नगरी, सेक्टर ६ व ४, नेहरू नगर, संत तुकाराम नगर, दापोडी आणि कासारवाडी या भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. याच उपकेंद्रातील ८० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्रामध्ये दि. २ फेब्रुवारी रोजीही अंतर्गत बिघाड झाला होता. त्यावेळी महावितरणच्या भोसरी व पिंपरी विभागामार्फत पर्यायी यंत्रणेद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले होते.
सद्यस्थितीतही पर्यायी व्यवस्थेद्वारे इतर वीज वाहिन्यांवर अतिरिक्त भार टाकून वीजपुरवठा सुरू केला आहे. मात्र, अतिरिक्त भारामुळे काही ठिकाणी तात्पुरते व्यत्यय येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या अडचणींवर त्वरित उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महावितरण प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच वीज ग्राहकांनी संयम बाळगून विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एमआयडीसीतील लघु उद्योजक हैराण
पिंपरी-चिंचवड एमआयडीसीतील वीज समस्येने लघु उद्योजक हैराण झाले आहेत. वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने उत्पादन प्रक्रियेवर परिणाम झाला. त्यामुळे अतोनात नुकसान होत आहे. एमआयडीसी भागात अखंडित वीजपुरवठा कधी होणार? असा सवाल पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी उपस्थित केला आहे.