उद्योगनगरीतील नागरिकांच्या जिवापेक्षा अधिकाऱ्यांना होर्डिंग्जधारकांची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 09:43 IST2025-05-13T09:42:40+5:302025-05-13T09:43:14+5:30

- होर्डिंगवरील जाहिराती उतरविण्याची मुदत घटविली : आकाशचिन्ह विभागाचा अजब कारभार; पावसाळ्यापूर्वी दोन आठवडे आधी होर्डिंग्ज रिकामे करण्याचा निर्णय

pimpari-chinchwad Officials care more about hoarding holders than the lives of citizens in the industrial city | उद्योगनगरीतील नागरिकांच्या जिवापेक्षा अधिकाऱ्यांना होर्डिंग्जधारकांची काळजी

उद्योगनगरीतील नागरिकांच्या जिवापेक्षा अधिकाऱ्यांना होर्डिंग्जधारकांची काळजी

पिंपरी : वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना होऊ नये, यासाठी खरबदारी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने १५ मे ते १५ जून, असे दोन महिने सर्व होर्डिंग्जवर जाहिरात न लावता, ती रिकामी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला होर्डिंग्जधारकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने निर्णय फिरवला आहे. आता २५ मे ते ७ जून अशा १४ दिवसांसाठी हा निर्णय मर्यादित करण्यात आला आहे. उद्योगनगरीतील नागरिकांच्या जिवापेक्षा अधिकाऱ्यांना होर्डिंग्जधारकांचीच काळजी असल्याचे दिसत आहे.

शहरातील जाहिरात होर्डिंग्जचालक व धारक आणि आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक ९ एप्रिलला झाली. वादळी वारे, अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यात जीवित व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच्या १५ एप्रिल ते १५ जून, असे दोन महिने होर्डिंगवर जाहिरात बॅनर न लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्या काळात होर्डिंग रिकामे ठेवण्यात येणार होते. त्या निर्णयास होर्डिंगचालकांनी सहमती दिली होती. मात्र, त्या मुदतीमध्ये शहरातील बहुतांश होर्डिंग्जवर जाहिरात झळकत आहेत.

गृहप्रकल्प, राजकीय नेते, कार्यक्रम, निमंत्रण पत्रिका, क्रीडा स्पर्धा, वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा जाहिराती झळकत आहेत. त्याबाबत महापालिकेवर टीका झाल्यानंतर आकाशचिन्ह व परवाना विभागाने होर्डिंगचालकांची उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी बैठक घेतली. या काळात होर्डिंगवरील जाहिरातीसाठी मोठे उत्पन्न मिळते. त्यामुळे जाहिरात न लावल्यास उत्पन्न बुडते, असा सूर त्यांनी आवळला. त्याला सहमती देत मुदत केवळ दोन आठवड्यांवर आणण्यात आली आहे. २५ मे ते ७ जून या १४ दिवसांत होर्डिंगवर जाहिराती न लावता ते रिकामे ठेवले जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

होर्डिंगचालकांचे नुकसान होऊ नये म्हणून दक्षता

जोरदार वादळी वाऱ्यामुळे लोखंडी जाहिरात होर्डिंग कोसळून शहरात असंख्य दुर्घटना घडल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे किवळे येथील जाहिरात होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. तर, तीनजण जखमी झाले होते. ती दुर्घटना १७ एप्रिल २०२३ ला घडली. शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग कोसळून दुकान, टपऱ्या व वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरबदारी म्हणून महापालिकेने पावसाच्या सुरुवातीस दोन महिने होर्डिंगवर जाहिराती न लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, होर्डिंगचालक, धारक व जाहिरात एजन्सीचालकांचे उत्पन्न बुडू नये, म्हणून तो कालावधी केवळ १४ दिवसांवर आणण्यात आला आहे. होर्डिंगचालकांच्या दवाबामुळे महापालिकेने निर्णय फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दोन महिन्यांच्या काळात जाहिरातीद्वारे मोठे उत्पन्न मिळते. त्यामुळे तो कालावधी कमी करण्याची विनंती होर्डिंगचालकांनी केली. त्यानुसार पावसाळ्यापूर्वीच्या दोन आठवड्यांच्या काळात होर्डिंग रिकामे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या काळात होर्डिंगवर जाहिराती लावल्यास कारवाई करण्यात येणार आहे.  - डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका

Web Title: pimpari-chinchwad Officials care more about hoarding holders than the lives of citizens in the industrial city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.