- आकाश झगडे
पिंपरी : एकीकडे लग्नसराईचा काळ सुरू झाली असतानाच, दुसरीकडे आखातातील युद्धजन्य परिस्थितीने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. लग्नातील सर्वांत महत्त्वाचा घटक असलेल्या सोने-चांदी दराला युद्धाची झळ बसण्याची शक्यता असल्याने आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
युद्धाच्या भीतीमुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. युद्धकाळात लोकांचा चलनावरचा विश्वास कमी होतो, कारण चलनवाढ होते. अशा वेळी सोने एकमेव मालमत्ता असते, जी जगभरात कोठेही विकली जाऊ शकते आणि तिचे मूल्य टिकून राहते. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल वाढल्याने दररोज किमतीत चढउतार होत आहे. लग्नासाठी दागिने बनवणाऱ्यांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.ज्यांनी आधी सोन्याचे बुकिंग केलेले नाही, ते आता सोने खरेदी करावे की थांबावे, या द्विधा अवस्थेत आहेत. लग्नासाठी वर्षभर नियोजन करणाऱ्या कुटुंबांचे कंबरडे मोडल्यासारखी स्थिती आहे. हॉलचे भाडे, कपडे आणि इतर खर्च स्थिर असले तरी, सोन्याच्या दराचे गणित सुटलेले नाही.
युद्धाच्या काळातील भारतात झालेली दहा ग्रॅम सोन्यातील दरवाढ
युद्ध-युद्धापूर्वीचा अंदाजे दर- युद्धकाळातील अंदाजे दर (रुपयांमध्ये)
इराण-इराक (१९८०)-७५०-१,५००
इराक-कुवेत (१९९०)-३,१००-३,८००
९/११ हल्ला व अफगाण युद्ध (२००१)-४,४००-६,०००
रशिया-युक्रेन (२०२२)-४८,०००-५५,०००
मागील तीन महिन्यांतील दर
महिना-सुरुवातीचा अंदाजे दर- अखेरचा अंदाजे दर (रुपयांमध्ये) - बदल
जानेवारी- १,४५,०००-१,५९,५००-१०% -वाढ
फेब्रुवारी-१,६०,२००-१,६८,८००-५.५% -वाढ
मार्च-१,६७,५००-१,६३,३००-२.५% - स्थिर
युद्धजन्य परिस्थितीत सोन्याच्या दरात अनिश्चितता असते. काही तज्ज्ञांच्या मते येत्या काही काळात सोन्याचे भाव दोन लाखांच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. - मयूर सोळंकी, सोळंकी ज्वेलर्स.
आखाती युद्ध सुरू असले, तरी येत्या काही काळात सोन्याचे भाव स्थिर राहण्याची शक्यता असून वजनाने हलक्या दागिन्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. - लकीचंद कटारिया, सुनिती ज्वेलर्स
जगातील मोठ्या बँक व संस्थांनी मागील काही काळात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली आहे. लोकांचा डॉलरवरचा विश्वास कमी होत आहे. यामुळे दर कमी होण्याची चिन्हे नाहीत. उलट येत्या काळात दर दोन लाखांच्या जवळ जाऊ शकतात. - परमेश्वर कांबळे, कमोडिटी तज्ज्ञ
कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे दर वाढत असून, सोन्याचा भाव सध्या स्थिर आहे. येत्या काळात अमेरिकेत होणाऱ्या व्याजदराच्या बैठकीचा परिणाम सोन्याच्या दरावर होईल. व्याजदर स्थिर राहिले तर दर स्थिर राहतील. व्याजदर कमी केले तर दर वाढतील. - विलास भांबुर्डेकर, भांबुर्डेकर ज्वेलर्स
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत सोन्याचे दर स्थिर आहेत. मात्र, मागील दशकांमध्ये युद्धानंतर सोन्याच्या दरवाढीचा ट्रेंड पाहायला मिळाला आहे. यामुळे आगामी काळात दर वाढू शकतात. - दिलीप सोनिगरा, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशन
Web Summary : War in the Middle East impacts gold and silver prices, disrupting marriage season budgets. Experts predict potential price hikes due to global instability and suggest light jewelry purchases. Interest rate decisions in America will influence prices.
Web Summary : मध्य पूर्व में युद्ध का असर सोने-चांदी की कीमतों पर, विवाह बजट बिगड़ा। विशेषज्ञों का कहना है कि वैश्विक अस्थिरता के कारण कीमतें बढ़ सकती हैं, इसलिए हल्के गहने खरीदें। अमेरिका में ब्याज दर के फैसले कीमतों को प्रभावित करेंगे।