महायुतीचा धर्म पाळणाऱ्या भाजपच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार नको;सुनील शेळके यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:52 IST2025-10-15T18:51:23+5:302025-10-15T18:52:13+5:30
महायुती झाली तर ठीक, नाही झाली तरी ठीक; पण दिवाळीच्या पाडव्याला उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.

महायुतीचा धर्म पाळणाऱ्या भाजपच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार नको;सुनील शेळके यांचे आवाहन
वडगाव मावळ : विधानसभेच्या काळामध्ये भाजपचा जो सर्वसामान्य कार्यकर्ता महायुतीच्या आणि माझ्यामागे उभा राहिला, तो नगरपरिषद व पंचायत समितीच्या रिंगणामध्ये आला, तर तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार देऊ नका, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.
वडगाव येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आयोजित इच्छुकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार शेळके बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, माजी उपसभापती गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, सुहास गरुड, महिला अध्यक्ष सुवर्णा राऊत, दीपक हुलावळे, संतोष राऊत, दादा डफळ, चंद्रकांत दाभाडे, संतोष जांभूळकर उपस्थित होते.
शेळके म्हणाले की, पक्षाची कोअर कमिटी जो निर्णय घेईल। तो सर्वांनी मान्य करावा. मावळ तालुक्यामध्ये आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सर्व जागा राष्ट्रवादी लढवणार असून, पंचायत समितीच्या काही जागांबाबत महायुतीबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. महायुती झाली तर ठीक, नाही झाली तरी ठीक; पण दिवाळीच्या पाडव्याला उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.
या बैठकीत दि. २० ऑक्टोबररोजी अजित पवार यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे नगर परिषद नूतन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनाची चर्चा करण्यात आली. रामदास वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आमदार शेळके यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.