कारण- राजकारण : भावी उमेदवार समाज माध्यमांवर व्यस्त; जनतेशी संवादाचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:21 IST2025-10-30T16:19:47+5:302025-10-30T16:21:27+5:30
- भावी उमेदवारांनी थेट संवाद टाळला; नागरिकांच्या अपेक्षांना तडा, “कोण आपला-कोण परका?” या प्रश्नावर मतदारांमध्ये चर्चा तीव्र

कारण- राजकारण : भावी उमेदवार समाज माध्यमांवर व्यस्त; जनतेशी संवादाचा अभाव
- अमृता दातीर-जोशी
सांगवी : जोडून आलेल्या दिवाळीच्या सुट्ट्या या भावी उमेदवारांना लोकांशी थेट संपर्क वाढवण्याची, स्थानिक प्रश्न समजून घेण्याची आणि स्वतःची उपस्थिती दाखवण्याची उत्तम संधी होत्या. मात्र काही अपवाद वगळता बहुतांश इच्छुकांनी ही संधी वाया घालवली. समाजमाध्यमांवर मात्र ते सक्रिय दिसले, पण जनतेशी प्रत्यक्ष संवादात मात्र स्पष्ट अभाव जाणवला.
निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर निवडणूक प्रक्रियेला वेग येणार हे निश्चित आहे. तरीसुद्धा संभाव्य उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधण्याऐवजी नेतेमंडळी व पक्षश्रेष्ठींशी जवळीक साधण्यासच अधिक प्राधान्य दिले.
आरक्षण, प्रभागरचना, युती, आघाडी की स्वबळ अशा अनेक अनिश्चिततेमुळे उमेदवारीच्या शक्यता धूसर आहेत. या धाकधुकीमुळे अनेक इच्छुकांनी थेट लोकांमध्ये जाणे टाळले, असे जाणकार सांगतात. मात्र समाजमाध्यमांचा वापर त्यांनी जोमाने केला असून, शुभेच्छा संदेश, छायाचित्रे आणि “मी लोकांमध्ये आहे” अशा प्रकारच्या पोस्टचा अक्षरशः पूर आलेला दिसतो.
सार्वजनिक भेटीगाठींना बगल; जनतेत नाराजी
दिवाळीच्या सणानिमित्त काही सामाजिक संस्थांनी आणि गृहसमित्यांनी उमेदवारांना स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. पण अनेकांनी अशा उपक्रमांना प्रतिसाद दिला नाही. जनतेने पुढाकार घेऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. नेत्यांच्या उपस्थितीपेक्षा उमेदवाराच्या कामाचा आणि समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाचा जनतेला अधिक महत्त्व वाटते. पण या दिवाळीत लोकांच्या अपेक्षांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही, हा मतदारांसाठी निराशाजनक अनुभव ठरला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एकच प्रश्न गुंजू लागला आहे – “कोण आपला? कोण परका?” आता हा निर्णय अत्यंत सावधपणे घेण्याची वेळ आली आहे.
पुढील निवडणुका ठरवतील दिशादर्शक
येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांचा विश्वास कोणावर बसतो, हेच राजकारणाची दिशा ठरवेल. “कार्य महत्त्वाचे की व्यक्ती की पक्ष?” या प्रश्नाचा विचार आता मतदार करू लागले आहेत, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. शहर आणि गावठाण परिसरातील कचरा, रस्ते, पाणीपुरवठा यांसारखे अनेक मूलभूत प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांच्या दुर्लक्षामुळे जनतेच्या अडचणी दुय्यम ठरत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी स्पष्ट केले आहे.