पुणे-लोणावळा तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका पाच वर्षात पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:32 IST2025-08-22T19:31:36+5:302025-08-22T19:32:23+5:30
- प्रकल्पासाठी ५,१०० कोटींचा खर्च : केंद्र सरकारसोबत संयुक्तपणे राबवली जाणार योजना; गर्दी आणि विलंब कमी होऊन पुणे-मुंबई कॉरिडॉरची क्षमता वाढणार; ७० अतिरिक्त गाड्या धावणार

पुणे-लोणावळा तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका पाच वर्षात पूर्ण होणार
- रवींद्र जगधने
पिंपरी :पुणे ते लोणावळा या व्यस्त रेल्वे र्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारसोबत संयुक्तपणे हा प्रकल्प राबविला जाणार असून अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ५,१०० कोटी रुपयांचा खर्च येणार असून साधारण पाच वर्षात प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या मार्गावर २१ लोकल गाड्यांच्या दोन फेऱ्या होतात म्हणजे ४२ लोकलसह एकूण ७९ गाड्या धावतात. ज्यात सुमारे दोन लाख प्रवासी प्रवास करतात. या नव्या मार्गिकेमुळे गर्दी आणि विलंब कमी होईल, तसेच पुणे-मुंबई कॉरिडॉरची क्षमता वाढणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजित ५,१०० कोटी रुपये खर्च असून राज्य आणि केंद्र प्रत्येकी ५० टक्के उचलणार आहेत. राज्य सरकार जमीन मोफत देणार आहे. दोन वेळा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर झाला असून, क्षमता वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. नव्या मार्गिकेमुळे ७० अतिरिक्त गाड्या धावतील, गर्दी कमी होईल, वेळ वाचेल आणि मालवाहतूक सुधारेल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
जमीन अधिग्रहण, निविदा प्रक्रिया आणि बांधकामावर वेळ अवलंबून आहे. मागील अनुभवानुसार, अशा प्रकल्पांना पाच ते आठ वर्षे लागतात, परंतु लवकर सुरू झाल्यास पाच वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. निविदा आणि इतर प्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय हवा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सध्या असलेल्या दोन मार्गिकांचा इतिहास
पुणे ते लोणावळा मार्गावरील पहिली रेल्वे लाइन १८५६-१८५८ दरम्यान बांधण्यात आली. ती बोरघाट भागात असून, ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेने (जीआयपीआर) बांधली. पहिली गाडी १८५८ मध्ये धावली.
दुसरी लाइन १९२० च्या दशकात (सुमारे १९२८-१९२९) टाकण्यात आली, जेव्हा बोरघाटातील रिव्हर्सिंग स्टेशन काढून टाकून दुहेरी मार्गिका करण्यात आली. यामुळे क्षमता वाढली आणि १९७८ मध्ये ईएमयू (लोकल) सेवा सुरू झाली.
काम वेगात सुरू होणार
केंद्र सरकारने यापूर्वीच सहमती दर्शवली असून, मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेने यासाठी प्रयत्न केले. यापूर्वी २०१९ मध्ये डीपीआर सादर करण्यात आला होता, परंतु विलंब झाला. आता मंजुरी मिळाल्याने काम वेगाने सुरू होऊ शकते.
स्थानकांची संख्या आणि लोकलसाठी लागणारा वेळ
पुणे ते लोणावळा अंतर ६४ किलोमीटर असून मार्गावर एकूण १७ स्थानके आहेत. यात पुणे जंक्शन, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहू रोड, बेगडेवाडी, तळेगाव, वडगाव, काण्हे, कामशेत, मळवली आणि लोणावळा यांचा समावेश आहे. लोकल ट्रेनला सुमारे एक तास २० ते एक तास २५ मिनिटे लागतात.
वर्षानुवर्षे गर्दी आणि विलंबामुळे प्रवासी त्रस्त होते. नव्या मार्गिकेमुळे लोकल सेवा सुधारेल आणि मुंबई-पुणे प्रवास सुलभ होईल. मात्र, काम वेळेत पूर्ण होण्यासाठी सरकारने लक्ष द्यावे. - गुलाम अली भालदार, अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघ
पुणे-लोणा वळा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेमुळे मुख्य आणि उपनगरीय वाहतूक वेगळी होईल. त्यामुळे प्रवाशांना अधिक जलद आणि विश्वासार्ह सेवा मिळेल. महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त वित्तपुरवठ्याने राबविण्यात येणारी ही योजना आर्थिक विकासाला चालना देईल. - सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई रेल्वे विकास महामंडळ