नगररचना विभागात फायलीच्या गठ्ठ्यांचे ढीग;महापालिकेचा कृती आराखडा कार्यक्रम वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 15:38 IST2025-09-30T15:38:11+5:302025-09-30T15:38:59+5:30
- मोकळ्या जागेत मोठमोठी कपाटे उभी केल्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ये-जा करणे कठीण झाले आहे

नगररचना विभागात फायलीच्या गठ्ठ्यांचे ढीग;महापालिकेचा कृती आराखडा कार्यक्रम वाऱ्यावर
पिंपरी : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्याच्या आदेशानुसार विविध विभागांचे सुशोभीकरण व कामकाज सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. पण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागाचे कार्यालय गोदामासारखे झाले आहे. तेथे फायलींच्या गठ्ठ्यांचे ढीग पडले आहेत.
फायलींचे ढीग अक्षरशः जमिनीवर फेकले आहेत. मोकळ्या जागेत मोठमोठी कपाटे उभी केल्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ये-जा करणे कठीण झाले आहे. प्रत्येक टेबलावर फायलींचे ढीग असून, नियमित निपटारा होत नाही. या स्थितीमुळे कार्यालयात दैनंदिन कामकाज चालू असताना अनेकांना आश्चर्य वाटते. मागील १०० दिवसांच्या कृती आराखड्यात महापालिकेने दुसरा क्रमांकाचा पुरस्कार जिंकला होता. मात्र, काही दिवसांतच नगररचना विभागात जैसे थे स्थिती झाली आहे.
विभाग की गोदाम?
अनेक फायलींचे गठ्ठे कोपऱ्यात फेकून देण्यात आले आहेत. त्यामुळे तेथे गठ्ठ्यांचे ढीग साचले आहेत. आवारात मोठमोठी कपाटे लावण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांना ये-जा करणे गैरसोयीचे ठरत आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलावर फायलींचे ढीग साचले आहेत. त्याचा नियमित निपटारा केला जात नसल्याने या विभाग गोदाम बनला आहे.
अभिलेख विभागाकडे जागेची मागणी
नगररचना विभागाकडे नकाशे व फायलींची संख्या भरमसाट आहे. त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. विभागाची जागा कमी असल्याने मर्यादा येत आहेत. त्यासाठी नेहरूनगर येथील अभिलेख विभागात जागेची मागणी केली आहे. तेथे जागा उपलब्ध झाल्यानंतर सर्व फायली त्याठिकाणी हलविल्या जाणार आहेत, असे नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.