नेहरूनगरला गादी कारखाना, फर्निचरच्या दुकानांना भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 21:09 IST2025-04-02T21:07:22+5:302025-04-02T21:09:38+5:30

अग्निशामक दलाने आगीवर मिळविले नियंत्रण : लाखोंचे नुकसान; फर्निचरचे साहित्य जळून खाक, दोन मुली जखमी

pimpari-chinchwad news Massive fire breaks out at mattress factory, furniture shops in Nehrunagar | नेहरूनगरला गादी कारखाना, फर्निचरच्या दुकानांना भीषण आग

नेहरूनगरला गादी कारखाना, फर्निचरच्या दुकानांना भीषण आग

नेहरूनगर : येथील झिरो बॉईज चौकात असलेल्या दुमजली इमारतीमधील गादी कारखाना, फर्निचरचे दुकान आणि आसपासच्या घरांना बुधवारी (दि. २) भीषण आग लागल्यामुळे दुकानातील सर्व साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले. या घटनेत दोन मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत.

नेहरूनगर येथील झिरो बॉईज चौकात नितीन जाधव यांच्या मालकीच्या दुमजली इमारती आहेत. यामध्ये भाड्याने असलेल्या बाळासाहेब बनसोडे यांच्या पुणे कॉटन टेक्स्टाइल इंडस्ट्रीज, परमेश्वर फर्निचर आणि मुजाहिद अन्सारी यांच्या सजावट फर्निचर या दुकानांमध्ये प्रचंड आग लागल्यामुळे दुकानातील खुर्च्या, टेबल, फर्निचर, कपाटे, गाद्या, पलंग, कुलर, आदी साहित्य जळून खाक झाले. यात लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. नेमके आगीचे कारण समजू शकले नाही.

या आगीत दुकानांच्या वरच्या मजल्यावरही आगीचे लोळ उठले होते. त्यात येथील रहिवासी असलेल्या सात मुली अडकून पडल्या होत्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्या मुलींना सुखरूप बाहेर काढले. चेतना सावंत (वय २६) अश्विनी बागडे (२४) या दोघी किरकोळ जखमी झाल्या आहेत. याचबरोबर इमारतीच्या मागील बाजूस राहणाऱ्या सुधाकर लोंढे, श्रीराम खुणे, कल्पना लोंढे, विनोद लोंढे, रंजना अल्हाट, गौतम अल्हाट, विलास लोंढे, उत्तम आल्हाट यांच्या घरांतील साहित्यही जळून त्यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच, संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाच्या १५ अग्निशामक बंबांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी घरातील काही गॅस सिलिंडर अग्निशामक दलाकडून त्वरित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. स्थानिक नागरिकांनीदेखील या दुकानातील साहित्य बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे, संत तुकारामनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, आदींनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची सविस्तर चौकशी केली.

दरम्यान, नेहरूनगरमध्ये आगीच्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. संतोषीमाता चौक ते झिरो बाई चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांची, अग्निशमन दलाच्या, पोलिसांच्या गाड्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे हा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला होता. घटनास्थळी दोन रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या होत्या. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Web Title: pimpari-chinchwad news Massive fire breaks out at mattress factory, furniture shops in Nehrunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.