कर्जमाफी न दिल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील; नानासाहेब जावळे पाटील यांच्याकडून राज्य सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:19 IST2025-08-19T20:19:01+5:302025-08-19T20:19:14+5:30
कर्जमाफी न दिल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील; नानासाहेब जावळे पाटील यांच्याकडून राज्य सरकारवर टीका

कर्जमाफी न दिल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील; नानासाहेब जावळे पाटील यांच्याकडून राज्य सरकारवर टीका
पिंपरी : मराठा आरक्षण व कर्जमाफीचे आश्वासन देऊन महायुती सत्तेत आली आहे. आश्वासन पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयात घुसणार असून सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ, असे म्हणत अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.
काळेवाडी येथील इंदू लॉन्स याठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) मेळावा झाला. यावेळी नानासाहेब जावळे पाटील यांनी आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली.
नानासाहेब जावळे पाटील म्हणाले, गेल्या तीस वर्षांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी, मराठा आरक्षणासाठी आमची संघटला लढा देत आहे. अनेक सरकारे या राज्यामध्ये आली. परंतु शेतकऱ्यांचा खरा प्रश्न आजपर्यंत कोणीही सोडवत नाही. राज्यात कुठे पूर आहे, कुठ दुष्काळ आहे. परंतु सरकार कुठलाही निर्णय घेत नाही. हे सरकार कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले आहे. परंतु एक वर्ष झाले तरी कर्ज माफीवर बोलायला तयार नाहीत. विरोधी पक्ष किंवा सरकरमधले मंत्री आणि आमदार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग आहेत. शेतकऱ्यांचा आत्महत्या वाढल्या आहेत. एक महिन्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. त्याला दोन आठवडे झाले आहेत. दोन आठवड्यात निर्णय न झाल्यास सरकारला जागा दाखवून देऊ.
‘आता लाखोंच्या संख्येने मुंबईत जाणार’
आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. ते कसे द्यायचे हा सरकारचा विषय आहे. आम्हाला इडब्ल्यूएसमधून तर कधी एसईबीसी प्रवर्ग केला जातो. यामुळे आम्हाला नक्की कुठलं आरक्षण आहे हे कळायला मार्ग नाही. यामुळे मराठा समाजाची फरपट चाललेली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईला २९ तारखेला लाखोंच्या संख्येने जाणार आहोत. ही आरपारची लढाई असणार आहे. मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर या सरकारला पायदळी तुडवल्या शिवाय शांत बसणार नाही, असेही जावळे पाटील यांनी सांगितले.
‘आरक्षाणासाठी लढा देणाऱ्यांच्या पाठीशी’
कोणी एक व्यक्ती म्हणजे समाज होत नाही. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या प्रत्येकाला आमच्या संघटनेचा पाठिंबा आहे. त्यात मनोज जरांगे पाटील असो किंवा आणखी कोणीही असले तरी आम्ही आरक्षणासाठी एकत्र आहोत, असे नानासाहेब जावळे पाटील यांनी सांगितले.