Pimpari-chinchwad : बंदी असतानाही वाहनांवर क्रॅश गार्ड्स; अपघातांचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:03 IST2025-09-26T12:01:33+5:302025-09-26T12:03:09+5:30
- जीवितहानी वाढण्याची भीती, एअरबॅग सक्रिय होण्यास अडथळे; दुसऱ्या वाहनांना किंवा पादचाऱ्यांना गंभीर इजा; वाहन मालकांमध्ये जागरूकतेचा अभाव

Pimpari-chinchwad : बंदी असतानाही वाहनांवर क्रॅश गार्ड्स; अपघातांचा धोका
- रवींद्र जगधने
पिंपरी : वाहनांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने २०१७ पासून बंपर किंवा क्रॅश गार्ड्स (बुल बार) बसवण्यास बंदी घातली आहे, तरीही लाखो कार, एसयूव्ही आणि इतर वाहनांवर हे धातूचे संरक्षक दिसत आहेत. अपघातात हे बंपर जीवितहानी वाढवतात, हवाई पिशव्या (एअरबॅग) सक्रिय होण्यास अडथळा आणतात आणि दुसऱ्या वाहनांना किंवा पादचाऱ्यांना गंभीर इजा करतात. हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होत असून, वाहन मालकांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
वाहनांवर बंपर किंवा बुल बार बसवणे हे फक्त वाहनाचे सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा संरक्षणासाठी वाटत असले तरी, अपघातात ते घातक ठरतात. हे धातूचे संरक्षक वाहनाच्या क्रम्पल झोनला (ज्याने धक्का शोषून घेतला जातो) बायपास करतात आणि थेट फ्रेमला धक्का पोहोचवतात. परिणामी, अपघाताची तीव्रता वाढते आणि वाहनातील प्रवाशांना जास्त इजा होते. विशेषतः हवाई पिशव्या सक्रिय होण्यास वेळ लागतो किंवा त्या पूर्णपणे बंद होऊ शकतात. त्यामुळे चालक आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. पादचारी आणि दुचाकी वाहन चालकांसाठीही हे बंपर धोकादायक आहेत. अपघातात यामुळे इजा गंभीर होते. ते कठीण धातूचे असल्याने अवयव तुटण्याची शक्यता वाढते.
कायदा काय सांगतो?
मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ५२ अंतर्गत वाहनाच्या मूळ डिझाइनमध्ये बदल करता येत नाही. २०१७ मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी करून सर्व प्रवासी वाहनांवर (कार, एसयूव्ही) आघाडी आणि मागच्या बाजूला बंपर किंवा क्रॅश गार्ड्स बसवण्यास पूर्ण बंदी घातली. उल्लंघन झाल्यास कलम १९० आणि १९१ अंतर्गत दंड आकारला जातो. किमान १,००० रुपये ते ५,००० रुपयांचा दंड किंवा तीन महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आहे. परिवहन विभागाने अनेकदा निर्देश देऊनही रस्त्यांवर लाखो वाहने अशा बंपरसह धावताना दिसतात. अनेक वाहन विक्रेते आणि गॅरेज हे बंपर बसवतात.
कारवाईचे अधिकार कोणाकडे ?
बंपर बसवण्याविरुद्ध कारवाईचे अधिकार प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांकडे आहेत. दंडाची रक्कम १,००० ते ५,००० रुपये असते, तर वारंवार उल्लंघन झाल्यास वाहन जप्त करता येते.
वाहनांवर बंपर किंवा क्रॅश गार्ड्स बसविण्यास बंदी आहे. वाहनांच्या मूळ डिझाइनमध्ये बदल करता येत नाही. अशा वाहनांवर कारवाईच्या सूचना भरारी पथकाला देणार आहे. - राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड