Pimpari-chinchwad : डॉक्टरांच्या वेळकाढूपणामुळे नवजात शिशूचा'तालेरा'त मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:40 IST2025-12-05T17:39:44+5:302025-12-05T17:40:29+5:30
- कळा असह्य झाल्याने प्रसूती कक्षात नेऊन तिची प्रसूती केली असता, नवजात शिशूचा मृत्यू झाला. म

Pimpari-chinchwad : डॉक्टरांच्या वेळकाढूपणामुळे नवजात शिशूचा'तालेरा'त मृत्यू
पिंपरी : रात्रीपासून महिलेला प्रसूती वेदना होत असताना वेळकाढूपणा करणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी तिला डाव्या कुशीवर झोपण्यास सांगितले. मात्र, कळा असह्य झाल्याने प्रसूती कक्षात नेऊन तिची प्रसूती केली असता, नवजात शिशूचा मृत्यू झाला. महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात बुधवारी (दि.३)पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. याची वैद्यकीय विभागाकडून चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका २३ वर्षीय महिलेच्या प्रथम गर्भावस्थेतील तपासण्या सर्व तालेरा रुग्णालयात सुरू होत्या. त्यात बाळ व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले. नऊ महिने पूर्ण झाल्याने ती प्रसूतीसाठी दाखल झाली. मंगळवारी सायंकाळी सहापासून प्रसूतीच्या वेदना जाणवत होत्या. मात्र,डॉक्टरांनी तिला सतत डाव्या कुशीवर झोपण्यास सांगत वेळकाढूपणा केला. मध्यरात्री अडीचच्या सुमारास वेदना असह्य झाल्याने नातेवाईक आत गेले असता, देखरेख ठेवणारे डॉक्टर झोपलेले आढळून आले. त्यानंतर तिला प्रसूती कक्षात नेऊन नैसर्गिक प्रसूती केली.
विष्ठा श्वासनलिकेत गेल्याने मृत्यू
बाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. बाळ बाहेर येण्यासाठी धडपडत असताना त्याने पोटातच विष्ठा केली. ती विष्ठा त्याच्या श्वासनलिकेत गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी रुग्णालय प्रमुख डॉ. संजय सोनेकर यांनी केली आहे. या प्रकरणाची आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी चौकशी सुरू केली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
...तर बाळ वाचले असते
महिलेला प्रसूती वेदना होत असताना तिची तातडीने सोनोग्राफी केली असती, तर बाळ बाहेर येण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून आले असते. त्यावेळी प्रसूती केली असती, तर बाळ सुखरूप बाहेर आले असते. याप्रसंगी स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित नसल्याचे सांगितले जात आहे.
बाळ व्यवस्थित असल्याने प्रसूतीआधी सोनोग्राफी केली नाही. मात्र, बाळ बाहेर येण्याची धडपड करत असताना, त्याने पोटातच विष्ठा केली. ती त्याच्या श्वासनलिकेत गेल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला. देखरेखीसाठी नेमलेले प्रशिक्षणार्थी डॉक्टर झोपलेले नातेवाइकांना आढळून आले. त्या डॉक्टरांचा कामाचा पहिलाच दिवस होता. - डॉ. संजय सोनेकर,प्रमुख,तालेरा रुग्णालय