क्रिकेट सामन्यावर बेटिंग; पिंपरी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 09:56 IST2025-03-28T09:54:44+5:302025-03-28T09:56:13+5:30
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली

क्रिकेट सामन्यावर बेटिंग; पिंपरी पोलिसांची कारवाई
पिंपरी : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर बेटिंगप्रकरणी पिंपरी पोलिसांनी कारवाई केली. यात पोलिसांनी दोन लाख २५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी येथील रिव्हर रोड येथे बुधवारी (दि. २६ मार्च) रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई केली.
मयूर चंदर मेवानी (वय २५), धीरज चंदर मेवानी (२३) आणि आकाश हरेश आहुजा (२२, तिघेही रा. पिंपरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार विष्णू भारती यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रिव्हर रोड येथे बंद खोलीत मयूर मेवानी, धीरज मेवानी आणि आकाश आहुजा हे आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. यावेळी संशयित हे क्रिकेट लाइन गुरू या सोशल मीडिया ॲपद्वारे बेटिंग घेत होते. पोलिसांनी संशयितांकडून दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यात पाच मोबाइल फोन, डायरी, कागद, लिफाफा, तीन पेन व रोख रकमेचा समावेश आहे.