लोणाळ्यातील सहायक फौजदार लाचलुचपतच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:52 IST2025-09-30T17:51:56+5:302025-09-30T17:52:26+5:30
पुणे : दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लोणावळा शहर ...

लोणाळ्यातील सहायक फौजदार लाचलुचपतच्या जाळ्यात
पुणे : दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्या सहायक फौजदारास रंगेहाथ पकडले आहे.
शकील मोहम्मद शेख (वय ४५, रा. लोणावळा) असे लाचखोर सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. शकील शेख पुणे ग्रामीण पोलिस दलात नियुक्तीस आहेत. त्यांची नेमणूक लोणावळा शहर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या नारायणीधाम पोलीस चौकीत आहे.
एका ४२ वर्षीय तक्रारदाराविरुद्ध लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास शकील शेख हे करत आहेत. या गुन्ह्यात तक्रारदाराला तपासात मदत करण्यासाठी शेख यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने ‘एसीबी’कडे तक्रार दाखल केल्यानंतर केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी तडजोडीत तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने शेख याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील,अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक आयुक्त भारती मोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.