हिंजवडी–वाघोली–शिक्रापूर वाहतूक कोंडीमुक्तीसाठी निर्णायक ‘रोडमॅप’...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:43 IST2025-11-27T12:42:36+5:302025-11-27T12:43:08+5:30
पीएमआरडीए आयुक्तांची सर्व विभागांसह मॅरेथॉन बैठक; ५ डिसेंबरपूर्वी खड्डेविरहित रस्त्यांचे आदेश

हिंजवडी–वाघोली–शिक्रापूर वाहतूक कोंडीमुक्तीसाठी निर्णायक ‘रोडमॅप’...!
पिंपरी : पुणे, हिंजवडी, वाघोली आणि शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उतारा म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आकुर्डी मुख्यालयात महसूल, वाहतूक, एमआयडीसी, महामार्ग प्राधिकरण, मेट्रो तसेच संबंधित विभागांसह विस्तृत आढावा बैठक घेतली. नागरिकांनीही यामध्ये हजेरी लावून थेट सूचना मांडल्या.
पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील, मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन समन्वयन अधिकारी कल्याण पांढरे, महापालिकेचे सह-शहर अभियंता बापू गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, पीएमआरडीएच्या विकास परवाना विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक श्वेता पाटील, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, महामेट्रोचे राजेश जैन उपस्थित होते.
बैठकीत ५ डिसेंबरपूर्वी संपूर्ण क्षेत्र खड्डेविरहित करण्याचे आदेश देण्यात आले. हिंजवडीतील नवीन प्रस्तावित रस्ते आणि अस्तित्वातील मार्गांच्या भूसंपादनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हिंजवडी फेज–१ ते फेज–३ दरम्यानचा रस्ता आणि एलिव्हेटेड कॉरिडोरसाठी भूसंपादनाचा प्रस्ताव एमआयडीसीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, मेट्रो लाईन–३ खालील रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करून तो रस्ता पूर्ववत स्थितीत एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश मेट्रोलाही देण्यात आले. हिंजवडीत कायमस्वरूपी वाहतूक सिग्नल्स तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पीएमआरडीए निधी उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले.
परिसरात धूळ उडविणारे आरएमसी प्लॅन्ट व नियम न पाळणाऱ्या डंपर चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुणे–मुंबई बाह्यवळण मार्गावर अंडरपास आणि सेवा रस्त्यांचे काम वेगाने सुरू असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. भूगाव बाह्यवळण रस्त्याचे रखडलेले भूसंपादन मार्गी लागून पुढील आठवड्यात कंत्राटदारास कार्यादेश जाईल, असे एनएचएआयच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांनी सांगितले.
वाघोली–शिक्रापूर वाहतूक कोंडीसाठी समांतर ३० मीटरच्या बाह्यवळण मार्गाचे सीमांकन पूर्ण झाले असून, महापालिकेमार्फत रस्ता विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरपी मार्ग आणि प्रत्यक्ष आखणीतील तफावतीबाबत समन्वयाने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. वाघोली–केसनंद नव्या बाह्यवळणमार्गाचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले.
शिक्रापूर चौकावरील कोंडीसाठी पीएमआरडीएमार्फत प्रस्तावित असलेल्या प्रादेशिक योजनेतील विविध पर्यायी रस्त्यांवरही चर्चा होऊन, भूसंपादनासह कामे गतीमान करण्याचे निर्देश महानगर आयुक्त डाॅ. म्हसे यांनी दिले. तळेगाव ढमढेरे–इसपत रस्ता, मझाक इंडिया–एल अँड टी फाटा–शिक्रापूर जोडरस्ते, पुलांच्या कामांसह अनेक प्रकल्पांमुळे हा परिसर वाहतूककोंडीमुक्त होणार असल्याचे मुख्य अभियंत्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
हिंजवडीतील नैसर्गिक नाल्यांच्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन दिवसांत पीएमआरडीएला सादर होणार असून, अतिक्रमणे व अडथळ्यांवर संयुक्त पथक कारवाई करणार आहे. पुणे महानगर प्रदेशातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गांसाठीचा हा सर्वसमावेशक ‘ॲक्शन प्लॅन’ राबविल्यास कोंडीग्रस्त हिंजवडी–वाघोली–शिक्रापूर पट्ट्याला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.