चिखलीचा 'टीपी' रद्द झाला, चऱ्होलीचा का नाही? शेतकरी-नागरिक आक्रमक;महापालिकेवर मारली धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:32 IST2025-05-17T13:31:52+5:302025-05-17T13:32:16+5:30

- नगररचना योजनेला वाढता विरोध; काळ्या फिती लावून निषेध; महापालिका प्रशासनाला निवेदन; योजना तातडीने रद्द करा, अन्यथा कडक भूमिका घेण्याचा पवित्रा 

pimpari-chinchwad kudalwadi demolition Chikhli TP cancelled, why not Choli ? Farmers-citizens aggressive | चिखलीचा 'टीपी' रद्द झाला, चऱ्होलीचा का नाही? शेतकरी-नागरिक आक्रमक;महापालिकेवर मारली धडक

चिखलीचा 'टीपी' रद्द झाला, चऱ्होलीचा का नाही? शेतकरी-नागरिक आक्रमक;महापालिकेवर मारली धडक

पिंपरी : नागरिक, शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केल्यानंतर चिखली-कुदळवाडी परिसरातील नगररचना ‘टीपी’ (योजना) प्रशासनाने रद्द केली. मात्र, चऱ्होलीच्या पाच ‘टीपीं’बाबत निर्णय घेतलेला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी महापालिकेवर धडक मारून निदर्शने केली. चिखलीचा ‘टीपी’ रद्द होतो, मग चऱ्होलीचा का नाही, असा जाब विचारला. सर्वांनी काळ्या फिती लावून निषेध केला आणि महापालिका प्रशासनाला निवेदन दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली-कुदळवाडीसह चऱ्होलीत पाच अशा एकूण सहा नगररचना योजना मागील महिन्यात जाहीर केल्या होत्या. त्याला चिखली परिसरातून मोठा विरोध झाला. जनरेट्यामुळे बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये चिखलीचा टीपी रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, यामुळे चऱ्होली परिसरातील शेतकरी संतप्त झाले.

शुक्रवारी सकाळीच चऱ्होलीतील मंदिरात बैठक झाली. यावेळी आमदार महेश लांडगे उपस्थित होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिकेवर धडक दिली. प्रवेशद्वारातच ठिय्या मांडला. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, बाळासाहेब मोळक, सचिन तापकीर, अजित बुरडे, कुणाल तापकीर, पंडित तापकीर, रोहिदास काकडे, शहाजी तापकीर, विकास बुरुडे, शशिकांत विकास बुरुडे, उल्हास काटे आदींसह शेकडो शेतकरी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आले. तेथे महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. काळ्या फिती लावून निषेध केला. ‘रद्द करा, रद्द करा, टीपी रद्द करा’, अशा घोषणा दिल्या. कोणत्याही परिस्थितीत ‘टीपी’ होऊनच देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास नगररचना संचालक प्रसाद गायकवाड यांना निवेदन दिले.

यापूर्वीही टीपी स्कीमला विरोध झाला. त्यावेळी तो सर्वांमुळे रद्द झाला. त्यानंतर आता पुन्हा योजना जाहीर झाली आहे. त्यास चऱ्होली परिसरातून विरोध होत आहे. याबाबत प्रशासनाची चर्चा केली आहे. - महेश लांडगे, आमदार

टीपी योजनेला विरोध होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता ही योजना तातडीने रद्द करावी, अन्यथा कडक भूमिका घ्यावी लागेल. - नितीन काळजे, माजी महापौर

Web Title: pimpari-chinchwad kudalwadi demolition Chikhli TP cancelled, why not Choli ? Farmers-citizens aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.