पिंपरी : वाढत्या शहरीकरणामुळे शहरे आता 'सिमेंटचे जंगल' बनली असून, त्यातच रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे तापमानाने उच्चांक गाठला आहे. मार्च महिन्यातच पारा चाळिशीकडे सरकत असताना, काँक्रीटच्या बांधकामामुळे शहरांच्या नैसर्गिक तापमानात २ अंशांपर्यंत वाढ होत आहे. रात्रीच्या वेळीही जमिनीतून निघणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांचा जीव कासावीस होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
शहरांमध्ये झाडांची संख्या घटून टोलेजंग सिमेंटच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यातच गेल्या काही वर्षांपासून डांबराऐवजी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यावर भर दिला जात आहे. डांबरी रस्ते उष्णता शोषून घेतात, मात्र सिमेंटचे रस्ते उष्णता अधिक काळ टिकवून ठेवतात. यामुळे शहराचा श्वास गुदमरत असून, रस्ते भट्टयांसारखे तापू लागले आहेत.
मार्च महिना सुरू होताच उन्हाचा चटका वाढला
यंदा मार्च महिना सुरू होताच उन्हाचा चटका प्रचंड वाढला असून अनेक शहरांत पारा चाळिशीपार गेला आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत आहे. शहरात वाढलेले काँक्रिटीकरण हे त्यामागील एक प्रमुख कारण आहे.
'अर्बन हीट आयलँड'चा धोका
तज्ज्ञांच्या मते, शहरांमध्ये 'अर्बन हीट आयलँड' परिणाम निर्माण झाला आहे. काँक्रीट हे उत्तम उष्णतावाहक असल्याने ते दिवसा सूर्याची उष्णता शोषून घेते. डांबराच्या तुलनेत सिमेंट हे उष्णता उत्सर्जित करायला जास्त वेळ घेते. यामुळे दिवसाचे कडक ऊन संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरून उष्ण झळा येत राहतात, ज्यामुळे रात्रीचा गारवाही हरवला आहे.
तापमानात दोन अंशांची भर
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील तापमान १.५ ते २ अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले जात आहे. काँक्रीटच्या भिंती आणि रस्ते यांच्यामध्ये खेळती हवा नसल्यामुळे उष्णता कोंडली जाते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ३८-३९ अंशांवर पोहोचलेला पारा एप्रिल-मे मध्ये सर्व विक्रम मोडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
'अर्बन हीट आयलँड' म्हणजे काय ?
शहरांमधील सिमेंटची जंगले आणि डांबरी रस्ते दिवसा उष्णता शोषतात आणि रात्री ती बाहेर सोडतात. यामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांचे तापमान कित्येक पटीने जास्त राहते, यालाच 'अर्बन हीट आयलँड' म्हणतात.
प्रदूषण आणि पावसाळ्यातील संकट मोठे
काँक्रिटीकरणामुळे केवळ उष्णताच वाढली नाही, तर सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढून हवेचे प्रदूषणही गंभीर झाले आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. काँक्रीटचे रस्ते पावसाचे पाणी अजिबात शोषून घेत नाहीत, त्यामुळे नैसर्गिकरीत्या पाणी जिरवण्याची क्षमता संपली आहे. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते.
Web Summary : Increased urbanization and concrete roads raise Pimpri-Chinchwad's temperature by two degrees. Concrete traps heat, creating an 'urban heat island' effect. This results in hotter days and nights, increased pollution, and reduced groundwater recharge, posing serious health and environmental risks.
Web Summary : शहरीकरण और कंक्रीट की सड़कों ने पिंपरी-चिंचवड का तापमान दो डिग्री बढ़ा दिया है। कंक्रीट गर्मी को फंसाता है, जिससे 'शहरी गर्मी द्वीप' प्रभाव पैदा होता है। इससे दिन और रातें गर्म होती हैं, प्रदूषण बढ़ता है और भूजल पुनर्भरण कम होता है, जिससे गंभीर स्वास्थ्य और पर्यावरणीय जोखिम होते हैं।