Pimpari-chinchwad : खुशखबर...! पिंपरी-निगडी मेट्रो जानेवारीपर्यंत पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:10 IST2026-03-21T15:09:27+5:302026-03-21T15:10:36+5:30
- अधिवेशनामध्ये शहराच्या दहा प्रश्नांवर चर्चा : पवना धरणातून ५२० एमएलडी पाणी आणणार

Pimpari-chinchwad : खुशखबर...! पिंपरी-निगडी मेट्रो जानेवारीपर्यंत पूर्ण होणार
पिंपरी : विधिमंडळाच्या अधिवेशनात पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, नदी सुधार, पर्यटन विकास, पर्यावरण यासह दहा प्रश्नांवर विधान परिषदेतील आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधी मांडली. त्यावर पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच पवना आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा प्रयत्न आहे, असे उत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिले.
आ. खापरे म्हणाल्या की, पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम संथगतीने चालू आहे. शहराची लोकसंख्या ४० लाखांवर पोहोचली असून, ७५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, ६२० एमएलडी पाणी मिळत आहे. त्यामुळे प्रलंबित पाणीपुरवठ्याचे प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. प्रॉपर्टी कार्ड, न्यायालय इमारत व अन्य प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज आहे.
मंत्री सामंत म्हणाले की, जानेवारीपर्यंत पिंपरी-निगडी मेट्रोचे काम पूर्ण होईल. मुळा नदी सुधार योजनेचे काम ९३ टक्के झाले आहे. पवना आणि इंद्रायणी नदीला निधी मंजूर झाला आहे. भामा-आसखेड प्रकल्प संथगतीने सुरू होता. त्यामुळे ठेकेदाराला निलंबित केले आहे. पवना धरणातून बंदिस्त पाइपलाइनद्वारे ५२० आणि आंध्रा धरणातून शहरासाठी १०० असे एकूण ६२० एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नद्या प्रदूषण कमी करण्यासाठी संयुक्त आराखड्याचे काम सुरू आहे.