Video : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर महिला आरटीओ-चालकात वाद; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 16:38 IST2026-02-21T16:33:17+5:302026-02-21T16:38:35+5:30
- अप्पर-डिप्पर प्रकाशझोतावरून बाचाबाची; गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

Video : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर महिला आरटीओ-चालकात वाद; व्हिडिओ व्हायरल
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर महिला आरटीओ अधिकारी आणि कॅबचालक यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.
नाशिक फाट्याहून निगडीच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कॅबचालकाने महिला आरटीओ अधिकाऱ्यांच्या वाहनाला अप्पर-डिप्पर दाखवला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद चिघळल्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी संबंधित चालकाला गाडी आडवी घालून थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा व्हिडीओतून करण्यात आला आहे.
दरम्यान, कॅबचालकाने मोबाइलवर या घटनेचे चित्रीकरण करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यामुळे नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी अधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर काहींनी चालकाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
यासंदर्भात महिला अधिकाऱ्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, घटनेचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस स्थानकात संबंधित कॅबचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, दोन्ही बाजूंची सखोल चौकशी केली जात आहे. घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.