पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर...! दररोज पाणी देण्याचे नियोजन सहा महिन्यांत करू - महापौर रवी लांडगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:45 IST2026-02-19T13:40:14+5:302026-02-19T13:45:32+5:30
- पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पही पूर्णत्वास नेणार

पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर...! दररोज पाणी देण्याचे नियोजन सहा महिन्यांत करू - महापौर रवी लांडगे
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी भामा-आसखेड धरणातून येणाऱ्या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य देऊ. पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत मावळातील बाधित शेतकरी, लोकप्रतिनिधींशी संवाद साधून, प्रशासकीय अडथळे दूर करून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू. दररोज पाणी देण्याचे नियोजन सहा महिन्यांत करू, असा निर्धार नूतन महापौर रवी लांडगे यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर व्यक्त केला. ‘लोकमत’च्या पिंपरी-चिंचवड कार्यालयात आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात महापौर लांडगे यांनी पाणी, कचरा, रस्ते, पर्यावरण आणि आर्थिक शिस्त याबाबत ठोस भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, भामा-आसखेडच्या जलवाहिनीचे काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यानंतर शहराला दररोज पाणी देणे शक्य होईल. सध्या प्रत्येक सोसायटीला एकच नळजोडणी दिल्याने पाणी वितरणात तफावत निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र नळजोडणी देण्याचा पर्यायही तपासला जाणार आहे. नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर ‘टँकर लॉबी’लाही आपोआप आळा बसेल. महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे, खड्डेमुक्त रस्ते आणि घराघरात कचरा वर्गीकरण सक्तीचे करण्यावर भर राहील. कुदळवाडी येथील अतिक्रमणांवरील कारवाईनंतर आता लघु उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग काढला जाईल.
नवीन विकासकामे निधी तपासूनच
लांडगे म्हणाले की, दुर्गा टेकडीवर ऑक्सिजन पार्क उभारणी, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि हरित शहर संकल्पनेवर भर दिला जाणार आहे. इंद्रायणी व पवना नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई होईल. महापालिकेवरील कर्ज लक्षात घेऊन सुरू असलेली कामे पूर्ण करण्यावर प्राधान्य देण्यात येईल. निधी तपासूनच नवीन विकासकामे हाती घेऊ. सीएसआर निधीचा वापर आणि थकबाकी वसुलीसाठी उपाययोजना केल्या जातील.